शासनाच्या कुटूंब परिभाषेमुळे सासू-सुनेत वाद

अर्थसहाय्य म्हणून मिळालेल्या रकमेची अशीही कहाणी

अमळनेर (सचिन चव्हाण)  : तालुक्यातील जवखेडा येथील पोलीस पाटील उल्हास लांडगे यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाल्याने शासनातर्फे ५० लाखाचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. दरम्यान शासनाने निश्चीत केलेल्या कुटुंबाची परिभाषा न कळल्यामुळे रकमेवरून सासू सुनेत वाद निर्माण झाला होता. दरम्यान सासू-सुनेत झालेले गैरसमज पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने मिटवण्यात येऊन दोघात सामंजस्याने रक्कम वितरित करण्यात आली.
जवखेड्याचे पोलीस पाटील उल्हास लांडगे याना गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. शासनाने कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या कुटुंबाला ५० लाख रुपये अनुदान जाहीर केले होते. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस पाटील संघटना यांनी कागदोपत्री पाठपुरावा करून शासन दरबारी आमदार अनिल पाटील यांनी प्रयत्न केल्याने लांडगे यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये अनुदान मंजूर झाले. मात्र कुटुंबाच्या व्याख्येत पत्नी आणि मुले असा गैरसमज होऊन संपूर्ण रक्कम आपलीच आहे असा ग्रह झाला होता. मात्र लांडगे यांची वृद्ध माता ही देखील कुटुंबाची सदस्य आहे आणि मुलाच्या अनुदानात कुटुंब सदस्य म्हणून तिचाही अधिकार असल्याने तिला देखील उदरनिर्वाहासाठी पैशाची अपेक्षा होती. सासू सुनेतील मतभेद दूर करण्यासाठी समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस पाटील संघटना एकत्र येऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या समक्ष हा वाद मिटवण्यात आला आणि पोलीस पाटील यांच्या वृद्ध मातेला ८ लाख ११ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते कुटुंबाला धनादेश वितरित करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष भानुदास पाटील, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, डी.ए. धनगर, अशोक पवार, मनोज रत्नपारखी, एस.सी. तेले, आंनदा बच्छाव, दिनेश भलकार, जगदीश भागवत, आर पी धनगर, पोलीस नाईक शरद पाटील हजर होते.