शासकीय सेवेत सामावुन घ्या: कंत्राटी आरोग्य कर्मचार्र्‍यांचे कामबंद आंदोलन

0

नंदुरबार: गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. शासकीय सेवेत सामावुन घेण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत पालकमंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी, खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, आ.शिरीष नाईक, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले.

शासनाची भूमिका उदासिन
सध्या कोरोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एनएचएम कर्मचार्‍यांनी रुग्ण सेवेत झोकुन दिले आहे. मात्र, कंत्राटी कर्मचार्‍यांबद्दल शासनाची भूमिका उदासिन आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात माघार न घेता एनएचएम कर्मचार्‍यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन अखंडपणे रुग्णसेवा सुरु ठेवली आहे. परंतु, कोरोनाच्या रुग्णावर उपचार करीत असतांना मास्क, ग्लोज, सॅनिटाईझर व आवश्यक ती सुरक्षेतची साधने उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. परंतु असे असतांनाही त्यासाठी या कर्मचार्‍यांना काळ्याफिती लावुन आंदोलन करावे लागत आहे. त्यावरही या आरोग्य कर्मचार्‍यांच्या मागण्याची दखल घेतली जात नाही. या कर्मचार्‍यांचा सेवाकाळ 15 वर्षापासून अधिक झाला आहे.

शासकीय सेवेत अद्यापही समायोजन नाही
शासनाने त्यांचे शासकीय सेवेत समायोजन केलेले नाही. त्यांना अद्याप अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. तुलनेने नव्याने झालेल्या कंत्राटी भरतीतील कर्मचार्‍यांनाही त्यांच्यापेक्षा अधिक मानधन देण्यात येते. परंतु याच कोरोना योध्दांची सरकारकडून दखल घेतली जात नाही. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामुळे 11 जुनपासून बेमुदत कामबंद राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीने घेतला आहे.
निवेदन देतेवेळी एल.जी.माळी (नंदुरबार), चंद्रकला पावरा (तळोदा), सविता गावित (नवापूर), शकुंतला ब्राह्मणे (धडगाव), पुष्पा बागुल (शहादा), सुनंदा वळवी (अक्कलकुवा), आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते उपस्थित होते.

Copy