शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले : बस चालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

जामनेर तालुक्यातील देऊळगावची घटना : संतप्त जमावाकडून बसची तोडफोड

जामनेर/भुसावळ : शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना खाजगी बसने चिरडल्यानंतर एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची संतापजनक घटना शनिवारी सकाळी जामनेर तालुक्यातील देऊळगाव येथे शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी खाजगी बसची तोडफोड केली होती. या अपघातात आर्यन नसीब तडवी (3) या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ रीहान (5) हा जखमी झाला होता. दरम्यान, अपघातप्रकरणी पहुर पोलिसात बस चालक फईम शाह मुस्ताक शाह (वाकडी, ता.जामनेर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

पायी जात असलेल्या भावंडांना बसची धडक
धामणगाव बढे बसस्थानकावरुन शनिवारी बालाजी ट्रॅव्हल्स ही खाजगी बस (क्र. एम.एच.21 बी.एच.- 0647) प्रवाशांना घेऊन जामनेरकडे निघाली असताना देऊळगाव गुजरी येथे रस्त्याने शाळेत पायी जात असलेल्या रीरहान तडवी आणि आर्यन तडवी या दोन भावंडांना बसने धडक दिली. यात चाकाखाली आल्याने दोन्ही भावंडे जखमी झाली. दोघांना उपचारार्थ बुलडाणा येथे नेते असताना आर्यनचा वाटेतच मृत्यू झाला तर रीहानची तब्येत गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

जमावाकडून बसची तोडफोड
अपघातानंतर गावातील जमावाने बसची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा येथूनही अतिरीक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या परीसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, लहान मुलांना धडक देणार्‍या बसचा चालकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.