शानभागच्या अध्यक्षांना ताकीद देत उपमुख्याध्यापकासह शिक्षकावर कारवाईचे आदेश

फि अभावी निकाल रोखल्याप्रकरणी शिक्षणाधिकार्‍यांकडून दखल

जळगाव : शानभाग विद्यालयाने फी अभावी विद्यार्थ्याचा निकाल रोखून धरल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शानभाग विद्यालयाला सक्त ताकीद देत आपल्या स्तरावर उपमुख्याध्यापक जयंत टेंबरे आणि वर्ग शिक्षक हर्षल सुधाकर घोलाने यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर दोघांवर काय कारवाई केली, याचा अहवाल उलट टपाली कार्यालयास सादर करण्याचे देखील आदेशात म्हटले आहे.
शानभाग विद्यालयाने ऑफलाइन निकाल जाहीर करून काही विद्यार्थ्यांना निकालपत्र वाटप केले होते. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे, त्यांचे निकाल विद्यालयाने रोखून ठेवले असल्याची तक्रार विद्याथ्याचे पालक तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. तक्रार झाल्यानंतर शानभाग विद्यालयाने आपला खुलासा सादर केला होता. तर खुलाशाविरूध्द शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे म्हणणे सादर केले होते. गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी या प्रकरणी शाळेतील विविध लोकांचे जाब जबाब नोंदवून घेतल्यानंतर चौकशीअंती शालेय प्रशासन दोषी आढळून
आले होते. तसा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांना पाठविण्यात आला होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना शानभाग विद्यालयाच्या संचालक मंडळाला पत्र पाठविले आहे. त्या पत्रात म्हटले की, आपल्या शाळेतील एका विद्यार्थ्याचा निकाल फीसाठी राखून ठेवला
व उशिराने संबंधित तक्रारदारास व्हॉटस्पद्वारे निकाल दिला आहे. तरी चौकशीअंती शालेय प्रशासन दोषी असल्याचे स्वयंस्पष्ट अहवाल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. तरी याबाबत सक्त ताकीद देण्यात येत आहे. यापुढे भविष्यात अशी बाब पुन्हा घडणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. फी अभावी निकाल रोखून ठेवल्याच्या प्रकरणात शालेय प्रशासन दोषी आढळून आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आदेशात म्हणत, शानभाग विद्यालयातील उपमुख्याध्यापक जयंत टेंबरे व शिक्षक हर्षल घोलाणे या कर्मचा-यांवर आपल्या स्तरावर कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.

उपमुख्याध्यापक जयंत टेंबरे यांनी शिंदे यांचे आरोप तथ्यहिन आहेत असे सांगितले होते. पण, या प्रकरणात शाळा दोषी आढळून आली असून टेंबरे व वर्ग
शिक्षक घोलाने यांच्यावर आपल्यास्तरावर कारवाई करण्याचे विद्यालयाला शिक्षणाधिकारी यांनी आदेश केले आहेत. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून जाणारी
संस्था आता सामाजिक बांधिलकी ठेवून या दोघांवर कारवाई करेल अशी अपेक्षा करतो.
– रवींद्र शिंदे, तक्रारदार पालक