शहीद जवानाच्या मुलीने दिल्ली सोडली

0

नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात सोशल मीडियावर मोहिम चालवणारी कारगिल मधील शहीद जवानाची मुलगी व दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिला ठार मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या आल्या होत्या. या विद्यार्थीनीने मंगळवारी दिल्ली सोडली असल्याचे तिच्या एका मित्राने सांगीतले. तसेच तिने सोशल मीडियावरील आपली मोहिम सुध्दा थांबवली. शिवाय आंदोलनापासून स्वतःला वेगळे केले आहे. मंगळवारी तिने ट्विट करुन तिने ही माहिती दिली. ट्विटमध्ये गुरमेहरने म्हटले, ’मी आंदोलनापासून वेगळी होत आहे. सर्वांचे अभिनंदन. माझी विनंती आहे की मला एकटे सोडा. मला जे म्हणायचे होते ते मी म्हटले आहे.’ दरम्यान, गुरमेहरला येणार्‍या बलात्काराच्या धमकीवरुन दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

केजरीवालांची चौकशीची मागणी
दिल्ली विद्यापीठात आज डाव्या विचाराच्या संघटनांनी गुरमेहरच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. मोर्चात विविध संघटनांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले. मात्र, गुरमेहर मोर्चात सहभागी झाली नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली तर राहुल गांधी यांनीही गुरमेहरचे समर्थन केले आहे.

गुरमेहरची आंदोलनातून माघार
गुरमेहर कौरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, एआयएसएने आयोजित केलेल्या मोर्चातून मी माघार घेत आहे. या वयात जे काही सहन करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे ते सर्वकाही मी सहन केले आहे. हे आंदोलन माझ्यापुरते मर्यादित नाही. तुम्ही सर्वांनी या आंदोलनाला जावे असे मला वाटते. या मोर्चाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी. मोर्चासाठी माझ्याकडून शुभेच्छा, असे गुरमेहरने म्हटले आहे.