शहाद्यात तीन खासगी दवाखाने सील

0

शहादा : शहरात कोरोना संसर्गाने शिरकाव केला असून चार इसम संक्रमित झाले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. चार संक्रमित पैकी यात गरीब नवाज कॉलनीतील 45 वर्षीय एका खासगी डॉक्टर व 23 वर्षीय कंपाऊडरचा समावेश आहेे. हा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. डॉक्टर कुटुंबातील 14 जणांना क्वारंटाईन करुन नंदुरबार येथे शासकीय रूग्णालयात रवानगी केली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने शहादेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आरोग्य विभागाने तीन खासगी दवाखाने सील केले आहेत. तालुक्यात 24 रोजी 1 आणि 25 रोजी 1 इसमांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. त्यातील 1 रुग्ण हा शहादा शहरातील नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 4 मधील न्यू बागवान गल्लीतील डॉक्टर असल्याचे निदर्शनास आले आहे. शहादा शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य इसमास होण्याची शक्यता विचारात घेता उपादांतातील अनुक्रमांक 10 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन उपविभागीय दंडाधिकारी शहादा तथा इन्सीडेंट कमांडर डॉ.चेतन गिरासे यांनी आदेश देत शहरातील नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 4 मधील प्रतिबंधात्मक क्षेत्र ( कंन्टेमेंट झोन ) व त्यास लागुन असलेल्या क्षेत्रास बफर झोन म्हणून घोषित केले आहे.
दरम्यान, संक्रमित इसमातील संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. नागरिकांनी माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रात तपासणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळताच त्यांनी त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Copy