Private Advt

शहाद्यात उद्यापासून ‘युवारंग’ महोत्सव

शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात मंगळवार, 20 ते शुक्रवार, 22 दरम्यान युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईच्या कलागुणांना वाव देणार्‍या या उत्सवाची तयारी पूर्णत्वास आल्यानंतर महोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मंगळवारी विविध ठिकाणचे संघ महाविद्यालयात दाखल झाले आहेत.

‘युवारंग’ महोत्सवाचे उद्या उद्घाटन
बुधवार, 20 रोजी सकाळी आठ वाजता युवारंग महोत्सवाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्याहस्ते होईल. अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील असतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे व्यवस्थापन परीषद सदस्य दिलीप रामू पाटील, जिल्हा परीषद सदस्या जयश्री दीपकभाई पाटील उपस्थिती असतील.

पाच रंगमंचावर कला प्रकार होणार सादर
एक खुल्या व चार बंदिस्त रंग मंचांवर सलग तीन दिवस विविध महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत. त्यात विडंबन नाट्य, मूकनाट्य, समूह लोकनृत्य, भारतीय लोकगीत, सुगम गायन, समूहगीत, शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, काव्यवाचन, वाद-विवाद, वकृत्व, शास्त्रीय वादन, भारतीय सुगम गायन, शास्त्रीय गायन, फोटोग्राफी, रांगोळी ,व्यंगचित्र, कोलाज, क्ले मोडेलिंग, स्पॉट पेंटिंग आदी कला प्रकारांचा समावेश आहे.

बक्षीस वितरणासाठी सिने अभिनेता जयंत वाडकर येणार
युवारंग कार्यक्रमाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी शनिवार, 23 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता प्रसिद्ध सिने अभिनेता जयंत वाडकर उपस्थित असतील. यावेळी आमदार राजेश पाडवी, विधान परीषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, कमलताई पाटील, जळगाव येथील डॉक्टर एस.टी. इंगळे उपस्थित राहतील. दरम्यान, यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एस.पी.पवार व प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 19 समित्यांचे सदस्य झटत आहेत.