शहादा पंचायत समितीत भाजपाची एकहात्ती सत्ता

शहादा : शहादा पंचायत समितीत सत्तांतर झाले असून सभापतीपदी भाजपचे वीरसिंग हरसिंग ठाकरे तर उपसभापतीपदी भाजपच्या कल्पना श्रीराम पाटील यांची निवड झाली. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असूनही भाजपने पंचायत समितीवर सत्ता काबीज केली.

काँग्रेस सदस्यांची सभेला पाठ
शहादा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झाली त्यात सभापती पदासाठी भाजप तर्फे वीरसिंग हरसिंग ठाकरे व उपसभापती पदासाठी कल्पना श्रीराम पाटील या दोघांनी नामांकन अर्ज दाखल केले तर काँग्रेस तर्फे सभापती पदासाठी सत्येन वळवी,गुपसिंग पावरा, निमा पटले या तिघांनी तर उपसभापती पदासाठी रोहिणी पवार,वैशाली पाटील या दोघींनी अर्ज दाखल केले होते. सभापती पदासाठी चार व उपसभापती पदासाठी तीन नामांकन दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान, 28 सदस्यांपैकी सभेवेळी सभागृहात भाजपचे 12 व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक सदस्य असे एकूण 13 सदस्य सभागृहात उपस्थित होते. काँग्रेसचे 14 व राष्ट्रवादीचा एक सदस्य असे एकूण 15 सदस्य सभागृहात गैरहजर होते.

पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड
यावेळी पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी निवडणूक प्रक्रिया घेतली. त्यात हात उंचावून मतदान प्रक्रिया झाली. काँग्रेसचे सदस्य उपस्थित नसल्याने सभापती व उपसभापती यांची निवडणूक एकतर्फी झाली. सभापतीपदी वीरसिंग ठाकरे तर उपसभापतीपदी कल्पना श्रीराम पाटील यांना प्रत्येकी 13 मते मिळाल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले तर गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी मदत केली.

निवडीनंतर जल्लोष
सभापती व उपसभापतीची निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करण्यात आला यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, संचालक अरविंद पाटील ,वैजाली येथील संजय पाटील माजी नगरसेवक राकेश पाटील, के. डी. पाटील, सह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, जिल्हा परीरषद सदस्य मोहन शेवाळे, राजेंद्र वाघ आदी पंचायत समितीच्या आवारात उपस्थित होते.