शहांची संपत्ती वेबसाइटवर; तुमची कुठे शोधायची?

0

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती जाहीर करा, अशी मागणी करणार्‍या शिवसेनेवर भाजपने शुक्रवारी जोरदार पलटवार केला. शहा यांची संपत्ती जाहीर करायची गरज नाही. त्यांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आधीच जाहीर करण्यात आलेली आहे; पण तुमची संपत्ती शोधायची कुठे? असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आले असता दानवे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. अमित शहा यांच्या संपत्तीची चिंता करू नका. ती वेबसाइटवर मिळेलच. पण तुमची संपत्ती आहे किती? आणि ती ठेवली कुठे? याचाच शोध घ्यायची वेळ आल्याचा टोला खा. दानवे यांनी हाणला.

भाजपच्या यशाने शिवसेनेला पोटदुखी

भाजपच्या यशाने शिवसेनेच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत. पण ही टीका आमच्यावर नसून जनतेवर आहे. आम्हाला निवडून दिल्यामुळे ते जनतेला शिव्या घालत आहेत. ‘लेकी बोले सुने लागे’सारखा हा प्रकार असून, जनता शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला खा. दानवे यांनी चढवला. भाजपची बदनामी करणारे खोटे मेसेज शिवसेना सोशल मीडियावरून फिरवत आहे. मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती असल्याचा आरोप करतानाच रायगडमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे फोटो एका बॅनरवर झळकले, यावरूनच शिवसेना कुणाच्या इशार्‍यावर काम करते हे स्पष्ट होत असल्याचे दानवे म्हणाले.

मनमोहन सिंग यांना कोणी ओळखत नव्हते!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही त्यांनी आगपाखड केली. भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची जागतिक पातळीवर ओळख होती. देश-विदेशात त्यांना कोणी ओळखत नव्हते असे सांगतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ही ओळख बदलली. त्यामुळेच त्यांच्या स्वागताला बराक ओबामांनाही विमानतळावर यावे लागल्याचे दानवे यांनी शेवटी स्पष्ट केले.