शहर वाहतूक शाखेची शहरात कारवाईची धडक मोहिम

0

45 हजार 200 रुपयांचा दंड वसूल:  वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या 430 वाहनांवर कारवाई

जळगाव: शहर वाहतूक शाखेतर्फे गुरुवारी सर्वत्र शहरात कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली. यात गोलाणी मार्केट, टॉवर चौक, महापालिका परिसरात बेशिस्त पार्किग, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल शीट, नो एट्रींमध्ये प्रवेश याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण 430 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 45 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर या काही वाहनधारकांना दंड भरण्यास मुभा देण्यात आल्याने 75 हजार एवढा दंड वसूल करणे बाकी असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देवीदास कुनगर यांनी बोलतांना दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिलीप पाटील, पोलीस कॉस्टेबल फिरोज तडवी, शशीकांत मराठे, गणेश लाठे, मुरलीधर पाटील, महिला पोलीस मनिषा विसपुते, मोहसीन खान, उदय सोनवणे यांच्या पथकाने शहरात गुरुवारी सकाळपासून कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली. गोलाणी मार्केट येथे एकेरी वाहतूक असतांना, नियम न पाळता वाहतूक करणार्‍या वाहनांधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहनधारकांकडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यानंतर शहरातील टॉवर चौक तसेच महापालिका परिसरात कारवाईसाठी मोर्चा वळविण्यात आला. यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी बेशिस्त वाहने, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सिट, परवाना न बाळगणे याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. दिवसभरात एकूण 430 वाहनधारकांवर कारवाई करण्यात येवून 45 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 75 हजारांचा दंड वसूल करणे बाकी आहे. शहर वाहतूक शाखेच्या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली होती.