Private Advt

नव मतदारांमधील जागृतीमुळे भारतीय लोकशाहीला बळकटी मिळेल   -प्रा.देवेंद्र इंगळे

जळगाव दि. २५-

            “एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य या लोकशाही तत्वावर आधारलेली आपली मतदान प्रणाली अत्यंत सशक्त आहे. भारतीय प्रजासत्ताक गणराज्य निर्मितीनंतर देशाने अनेक चढउतार अनुभवलेत. स्वातंत्र्य आंदोलनाने जी मूल्ये भारताला वारसा म्हणून दिलीत त्याचा अंगीकार भरतीय लोकशाही प्रणालीत करण्यात आली. आपल्या मतदान प्रणालीमध्ये नागरिकाला समान अधिकार, समान प्रतिष्ठा देण्यात आली आहे. यात जात-धर्म व राजकारण यांची युती तसेच सामाजिक-आर्थिक भेद नाकारून मतदाराच्या मताला अनन्य साधारण महत्व देण्यात आले आहे. नव मतदारांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे भारतीय लोकशाहीला बळकटी मिळेल. मतदान म्हणजे अमुलाग्र परीवर्तनाची नांदीच होय.” असे मत मू.जे.तील सामाजिकशास्त्र  प्रशाळेचे संचालक आणि प्रसिद्ध विचारवंत प्रा.देवेंद्र इंगळे यांनी मू.जे.महाविद्यालयाच्या वतीने २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

    या कार्यक्रमात दुसरे प्रमुख वक्ते एच.जे.थीम महाविद्यालयाचे डॉ.वकार शेख आपल्या व्याख्यानात म्हणाले की, ‘महाविद्यालयात येणारा युवक हा नव मतदार असतो. त्याला भारतीय लोकशाही आणि मतदान प्रणाली समजणे आवश्यक आहे. वेळोवेळी घेण्यात येणारे असे जनजागृती विषयक कार्यक्रम महत्वाचे आहेत. मतदारांमध्ये मतदान विषयाचे गांभीर्य वाढणे गरजेचे आहे.त्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळे प्रबोधनाचे उपक्रम राबविले जात असतात. भारत सरकारने ‘हैलो वोटर’आणि ‘ई-ईपिक’ असे ऐप सुद्धा तयार केलेले आहेत. भारतात निवडणूक प्रक्रिया राबवतेवेळी काही गुंतागुंती  दिसायला मिळतात. अजून काही वर्षात आपण त्यातून निश्चितच बाहेर येणार, यात शंकाच नाही. परंतु अशा वेळी मतदान प्रणाली अधिकाधिक मजबूत करण्यासाठी तरुण पिढीची भूमिका महत्वाची ठरेल.”

या कार्यक्रमात महाविद्यालयातील नव मतदार विद्यार्थ्यांमधून  प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थिनी चंचल संगीता सुनील धांडे हीने ‘आपल्या देशात लोकशाही रुजली आहे का?’ आणि विद्यार्थी दिनेश काशिनाथ नारखेडे याने ‘ मताधिकाराची  सक्ती करावी का?’या विषयावर आपले चिंतन-विचार प्रकट केलेत.

        या कार्यक्रमाला जळगाव उच्च शिक्षण विभागाचे सह-संचालक डॉ.संतोष चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांनी शुभेच्छापर संदेश ही महाविद्यालयाला दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सं.ना.भारंबे यांनी ही लोकशाही प्रणालीत मतदाराचे महत्व आणि मतदानाची बलस्थाने विशद केली. तसेच महाविद्यालयाच्या माध्यमातून मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वेबसाईट वर नोंदणीची लिंक आणि इतर महत्वाची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली गेली आहे, अशी माहिती दिली.’

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील मतदान नोडल अधिकारी डॉ.लक्ष्मण वाघ यांनी केले.स्वागत आणि सूत्रसंचालन प्रा.विजय लोहार यांनी केले. रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.दिलवरसिंग वसावे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्रशाळांचे संचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.