शहरात मोकाट गुरांवर विषप्रयोग?

0

भुसावळ : शहरातील दैनंदिन बाजाराजवळील तालुका पोलीस ठाण्याजवळ दोन वळूंचे मृतदेह संशयास्परित्या मंगळवार 27 रोजी पहाटेच्या सुमारास आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत विष प्रयोग केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान गायींसह वळूंवर नियमितपणे जीवघेणे हल्ले होत आहेत. याअगोरदही काही दिवसांपूर्वी महामार्गानजीक गायींना मारुन फेकून देण्यात आले होते. या प्रकारामुळे गोसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरात मोकाट गुरांची समस्या नवीन नाही. पालिका प्रशासन या गुरांचा बंदोबस्त करण्याच्या वल्गना अनेकदा करुन चुकले आहे. काही महिन्यांपुर्वी मोकाट गुरे पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याचे कंत्राट पालिकेने दिले होते. मात्र नंतर याची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्यामुळे गोसेवकांनी तक्रार दिली होती.

विधीवत अंत्यसंस्कार
या मृत वळूंना येथून उचलून त्यांना वाहनाद्वारे महामार्गालगत असलेल्या रेणूका मंदिराजवळ नेवून येथील खुल्या जागेत जेसीबीने खड्डे खोदण्यात आले. व विधिवत मृत वळूंचे पूजन करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करुन प्राण्यांविषयीची भुतदयेचे दर्शन घडले. यावेळी गोसेवक रोहित महाले, पवन नाले, हितेश टकले, जितू, अ‍ॅड. अजय जैन, अजिंक्य जैन, गोपी भैय्या, हरणे, राहूल पवार, विजय पाटील, हिरा मेहरे, प्रमोेद पाटील, शुभम पाटील, टाक, शाम इंगळे, शैलेंद्र सोनवाल यांनी अंत्यसंस्कार केले.

गोशाळेत व्यवस्था करावी
बाजारात भाजीपाला विक्रेते आपला उरलेला व खराब झालेला भाजीपाला सायंकाळी मोठ्या प्रमाणात फेकून देण्यात येत असल्याने या गुरांना अप्रत्यक्षपणे नियमित हिरवा भाजीपाला चारा म्हणून उपलब्ध होत असतो. यामुळे या परिसरात मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. 27 रोजी सकाळी याच ठिकाणी मृत दोन वळू आढळून आल्याने समाजविघातक प्रवृत्तींनी त्यांच्यावर विष प्रयोग केला असल्याची परिसरातील नागरीकांची चर्चा आहे. तसेच या गुरांच्या पायाला दोरी बांधण्यात आली असल्याचेही गोसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देऊन शहरातील मोकाट गुरांना सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची गोशाळेत व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे. अन्यथा यामुळे समाजविघातक प्रवृत्ती वाद निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.