शहरात केळी उत्पादन तंत्रज्ञान परिषद

0

जळगाव : नाशिकच्या अ‍ॅग्रीसर्च इंडिया प्रा. ली.तर्फे केळी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी, त्यातून मिळणार्‍या उत्पादन वृद्धीसाठी, केळी निर्यात व प्रक्रिया उद्योग या संदर्भात शेतकर्‍यांना सखोल मार्गदर्शन करण्यासाठी केळी उत्पादन तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन रविवार 8 जानेवारीला करण्यात आले होते. याप्रंगसी महाराष्ट्रातील कृषी संशोधन क्षेत्रातील विविध शास्त्रज्ञांची व तज्ज्ञांची विशेष उपस्थिती होती पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी सल्लागार डॉ. के. बी. पाटील, गुजराथ येथील आनंददृष्टी विद्यापीठतील सूत्रकृमी शास्त्रज्ञ डॉ. अशोकभाई पटेल , जळगावचे पीक विषाणू शास्त्रज्ञ डॉ. अखिलेश मिश्रा , नवसारी कृषी विद्यापीठचे निवृत्त डीन डॉ. आर. जी. पाटील यांची उपस्थिती होती.

या घटकांवर टाकला प्रकाशझोत
केळी पिकातील बियाण्याचे महत्व, केळी लागवडीत बियाण्याचे महत्व, उत्तम जनुकीय गुणवत्तापूर्ण बियाणे कसे लावावे, बियाणे जगण्याची खात्री कशी पडताळून पाहावी, कमी वयाच्या घडामुळे केळी पिकाचे होणारे नुकसान, केळी पिकासाठी अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचा वापर व उपसा, केळी पिकांसाठी आवश्यक अन्नद्रवे, जमिनीच्या आरोग्यविषयक मुख्य समस्या, जमिनीचा सामू व अन्नद्रव्याची उपलब्धता, न्यूट्रियंट रिलेशनशिप, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध, एका पेक्षा अधिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेस संवेदनशील पीके, सुक्षम अन्नद्रव्यांचे कार्य, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, तंत्रज्ञानामुळे शेती सोपी करण्याची पद्धत सोपी करणे, केळी लागवडी पूर्व व पश्चात करावयाचे व्यवस्थापन इत्यादी.

रोगांपासून केळीचा बचावाचे धडे
परिषदेत महाराष्ट्रातील केळी उत्पादन क्षेत्रातील ख्यातनाम शास्त्रज्ञांनी हजारो शेतकर्‍यांना उत्पादन, तंत्रज्ञान व व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. ख्यातनाम शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकार्‍यांनी यावेळी शेतकर्‍यांना कमीतकमी खर्चात गुणवत्तापूर्ण केळीचे उत्पादन कसे करावे, विविध रोगांपासून केळीचा बचाव कसा करावा, केळीच्या वाढीसाठी अन्नद्रव्य व घड व्यवस्थापन, केळी प्रक्रिया उद्योग, खोडापासून फायबर निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले.
परिषदेत जळगाव जिल्हा तसेच धुळे, नंदुरबार, बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकर्‍यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी विक्रमी उत्पादन घेणार्‍या व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी पीक घेणार्‍या शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.

स्मरणिका, दिनदर्शिकेचे प्रकाशन
परिषदेत केळी पिकावर आधारित स्मरणिका, दिनदर्शिकेचे प्रकाशन जैन उद्योग समूहाचे अभय जैन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अ‍ॅग्रिसर्च इंडियाचे संचालक प्रदीप कोठावदे यांनी केले तर परिषदेच्या यशस्वीतेसाठी ऍग्रीसर्च इंडियाचे शरद विसपुते, नामदेव परदेशी, उज्वल म्हाळसाने, श्री. बोरोले, रवींद्र शितोळे, प्रशांत नाईकवाडे, सुधाकर गानू आदींनी कामकाज पाहिले.सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. जैन इर्रिगेशनचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील , नाशिक सह्याद्री फार्मचे सचिन वाळुंजे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे, ऍग्रीसर्च इंडिया प्रा. ली.चे संचालक प्रदीप कोठावदे आदी उपस्थित होते.