शहरातून काढली शोभायात्रा

0

जळगाव । भगवान गौतम बुद्ध पोर्णिमे निम्मित शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामहिंद इंटरनॅशनल धम्मदुत सोसायटी आणि बुद्ध जयंती उत्सव समिती जळगाव शहर यांच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध यांची 2561 वी जयंती संघनायक महाथेरो पू. भदन्त एन. सुगतवंसजी यांच्या आशिर्वादाने व पू. भदत्न पी. संघरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. शहरातून भिक्षु संघाच्या वतीने रेल्वे स्टेशनसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून सदर शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते.

धम्मप्रेमी समाज बांधवांचा उत्स्फुर्तपणे सहभाग
शोभायात्रेला सुरुवात करण्याआगोदर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शोभायात्रा सकाळी 9 वाजता सुरू झाली. या शोभायात्रेत सर्व धम्मप्रेमी समाज बांधवांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. शोभायात्रा शिस्तबद्धतीने नेहरू चौक, टॉवर चौक, जुने बसस्टँड, शिवाजी महाराज पुतळा, नवे बसस्टँड, हेड पोस्ट ऑफीस, पांडे डेअरी चौक, सिंधी कॉलनी रोडने संत चोखामेळा वस्तीगृहात सकाळी 11.30 वाजता पोहोचली. शोभायात्रेचे अनेक ठिकाणी शितपेय देऊन स्वागत करण्यात आले. शोभायात्रोसाठी सजविलेले रथातील गौतम बुद्धांच्या आकर्षक मुर्तीचे समाज बांधवांनी दर्शन घेतले. तसेच विविध ठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा
संत चोखामेळा वस्तीगृहात धम्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व बुद्ध वंदना घेण्यात आली. पू. भन्ते पी. संघरत्न यांनी यावेळी भगवान गौतमबुद्धांच्या जीवनावर धम्मदेसना (प्रवचन) दिले. भगवान गौतम बुद्धांच्या आर्य अष्टांगीक मार्गाचा अवलंब केल्याचा कुणीही व्यक्ती व प्राणी दुःखी राहु शकत नाही. असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. यासोबत मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बहुसंख्येने उपस्थित असलेल्या धम्मबांधवांनी भोजनदानाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महामहिंद धम्मदुत सोसायटी आणि बुद्ध जयंती उत्सव समिती जळगाव शहर यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले.

अनुरूप केदारचे बुद्ध भाष्य
संत चोखामेळा येथे बुद्धपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये अनुरूप मिलिंद केदार 10 वीच्या वर्गात शिकणार्‍या या विद्यार्थ्याने बुद्धाच्या जीवन शैलीबाबत महत्व इंग्रजी भाषेमध्ये पटवून सांगितले. बुद्धांचा जन्म, जीवन कार्य,भगवान गौतमांना ज्ञान प्राप्ती ,भिक्षुंना दिलेली दीक्षा ,बुद्धाचे महापरीनिर्वाण आदी विषयावर बुद्धांचा जीवनपट समजावून सांगितला. आतापर्यंत भगवान गौतमाच्या जीवनात झालेल्या महत्वाच्या घडामोडी ह्या वैशाख महिन्यात झाल्या याबाबत अनुरूप केदार याने जीवनक्रम मांडला.