शहरातील पदपथांवर 77 हजार अडथळे; नागरिकांची गैरसोय

0

पालिकेच्या सर्वेक्षणातून उघड : लवकरच महावितरणसोबत बैठक

पुणे : महावितरणचे फीडर पिलर्स, डीपी बॉक्स, केबल्स, स्वच्छतागृहे, खाद्यपदार्थ आणि विक्रेत्यांची अतिक्रमणे, पीएमपीचे बसथांबे असे 77 हजार अडथळे पदपथावर असल्याचे महापालिकेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. त्यापैकी 70 टक्के अडथळे महावितरणच्या डीपी आणि फीडर पिलर्सचे असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. हे अडथळे अद्याप दूर झाले नसल्याने पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. पदपथावरील अडथळे दूर करण्यासंदर्भात महावितरणसोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

फीडर पिलर्समुळे पादचार्‍यांना त्रास

शहरात एकूण 1,400 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. रस्त्यांलगतच्या पदपथांची रुंदी 1.8 मीटर असावी, तसेच सहा ते नऊ इंचापर्यंत पदपथाची उंची असावी, असा पालिकेचा नियम आहे. पादचारी धोरणांतर्गतही शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पदपथ विकसीत करण्यात येत आहेत. मात्र, अनेक पदपथांना अनधिकृत पथारीधारकांच्या, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांचा विळखा कायम आहे. बहुसंख्य पदपथांवर पालिकेचे दिवे, बसथांबे, स्वच्छतागृहे, आरोग्य कोठ्यांचे अतिक्रमण झाले आहे. उर्वरित पदपथांवर महावितरणचे डीपी बॉक्स, फीडर पिलर्स, केबल्स असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पदपथ संकुचित झाला असून, पादचार्‍यांना चालणे अवघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने काही वर्षांपूर्वी पदपथावरील अडथळ्यांचे सर्वेक्षण केले होते. पदपथांवरील फीडर पिलर्समुळे पादचार्‍यांना त्रास होत असल्याची बाब समोर आली होती. या पार्श्‍वभूमीवर शहरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणारे फीडर पिलर्स हटवून योग्य जागी स्थलांतरीत करावेत, अशा सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या होत्या. या संदर्भात लवकरच महावितरणसोबत बैठक घेतली जाणार असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले.

Copy