शहरातील पथदिवे धोकादायक

0

10 हजार पथदिव्यांना आर्थिंगच नाही : महापालिका प्रशासनाकडून सर्वेक्षण

पुणे : शहरातील रस्त्यांवर नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने लावलेले पथदिव्यांचे खांब यमदूत बनून उभे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पथदिव्यांमध्ये थेट वीज प्रवाह वाहत असून त्याला स्पर्श झाल्यास एखाद्याला जीव गमवावा लागणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेनेच गेल्या महिन्याभरात केलेल्या 76 हजार पथदिव्यांच्या तपासणीतून ही बाब उघड झाली आहे. त्यात 10 हजार पथदिवे आर्थिंग शिवायच सुरू असून अद्याप 60 हजारहून अधिक पथदिव्यांचे सर्वेक्षण सुरू असून त्यातही जवळपास तेवढेच विनाआर्थिंग आढळून येतील, असेही विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.

60 हजारहून अधिक खांबांचे सर्वेक्षण बाकी

मागील महिन्यात वारजे येथील एका लहान मुलाचा पथदिव्याच्या खांबाला आर्थिंग नसल्याने वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विद्युत विभागाने कनिष्ट अभियंत्यांच्या मदतीने तातडीने शहरातील सर्व पथदिव्यांचे सर्वेक्षण हाती घेतले होते. त्यानुसार, गेल्या महिन्याभरात जवळपास 76 हजार पथदिव्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून 10 हजार पथदिवे आर्थिंगविनाच सुरू आहेत. त्यामुळे या पथदिव्यांच्या खांबामध्ये विद्युत प्रवाह संचारीत असून रस्त्याने जाणार्‍या अथवा पदपथावर असलेल्या या खांबाला एखाद्या नागरिकाचा स्पर्श झाल्यास त्याला जीव गमवावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अद्यापही जवळपास 60 हजारहून अधिक खांबांचे सर्वेक्षण बाकी असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या खांबांची स्थिती पाहाता आणखीन तेवढेच खांब आर्थिंगविना सापडण्याची दाट शक्यता आहे.

जबाबदारी कोणावर ?

महापालिकेने हे पथदिवे बसविण्याचे काम ठेकेदारांना दिले होते. त्यामुळे पथदिवे खांबाची सुरक्षीत उभारणी करणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र, शहरात लाखो खांबा असल्याने तसेच कोणता खांब कोणत्या ठेकेदाराने बसविला आहे. याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नसल्याने जबाबदारी कोणावर निश्‍चित करणार, असा प्रश्‍न आहे. त्यातच ठेकेदारांनी केलेल्या कामाचे बील अदा करताना, खांबांची सुरक्षितता तपासून घेणे ही संबंधित कनिष्ट अभियंता, उपअभियंत्याची आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही सुरक्षेची तापसणी न करताच कामाची बिले अदा केली आहेत. त्यामुळे एखादी दुघर्टना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍न आहे.

8 हजार खांबाची दुरुस्ती केल्याचा दावा

आर्थिंग नसलेल्या 10 हजारपैकी 8 हजार खांबांची दुरुस्ती केल्याचा दावा विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे काम तातडीने हाती घेतले असून ते पूर्ण केले जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच नागरिकांची सुरक्षीतता लक्षात घेऊन उर्वरीत खांबांचे सर्वेक्षण कमीत कमी वेळेत पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चुकीच्या कामाची जबाबदारी सर्वस्वी कनिष्ट अभियंते आणि ठेकेदारांची असून एखादी दुर्घटना घडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही कंदूल यांनी स्पष्ट केले.