शहरातील करवाढ त्वरीत मागे घेतली पाहिजे

0
विकास समितीचा आंदोलनाचा इशारा
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने केलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीत मालमत्ता धारकांना प्रचंड कर आकारणी करण्यात आलेली असून ही करवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीने पत्रकार परिषदेत केली अन्यथा यासाठी जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला. तळेगाव दाभाडे शहर सुधारणा व विकास समितीने नगरपरिषदेने वाढविलेल्या प्रचंड कर आकारणीबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, कृष्णा कारके, गटनेते किशोर भेगडे यांचेसह आज-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
33 हजार नागरिकांना वाढीव करपट्ट्या
तळेगाव नगरपरिषदेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्षांच्या मुळे ही प्रचंड करवाढ तळेगावकर नागरिकांच्यामाथी आलेली असून आता जनतेचा कळवळा घेण्याचे ढोंग करीत असल्याचा आरोप गटनेते किशोर भेगडे यांनी यावेळी केला. भारतीय जनता पक्षाने 2 नोव्हेंबर रोजी विशेष सभा घेऊन 10 टक्के करवाढ करणेचा ठराव केलेला आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांवर ही प्रचंड करवाढ आली आहे. नगरपरिषदेने शहरातील 33 हजार नागरिकांना वाढीव करपट्ट्या पाठविल्या असून नागरिकांनी त्या विरुध्द नगरपरिषदेमध्ये लेखी स्वरूपात हरकती घ्याव्यात असे आवाहन बबनराव भेगडे यांनी केले. शहर सुधारणा व विकास समिती ही नागरिकांवर झालेल्या अन्याया विरोधी असून त्यासाठी न्याय मार्गाने आंदोलन करेल तसेच न्यायालयात याचिकाहि दाखल करेल.
Copy