शशिकलांचा पत्ता कट! चार वर्षांचा कारावास

0

चेन्नई । तामिळनाडूतील सत्तासंघर्षाला मंगळवारी धक्कादायक वळण मिळाले. अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांना बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले. तसेच, त्यांना निर्दोष ठरविणारा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवित कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला. न्यायालयाने शशिकला यांना चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून, दहा कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच, तातडीने कनिष्ठ न्यायालयासमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍या शशिकलांची रवानगी थेट कारागृहात होणार आहे. या निर्णयानंतर शशिकला यांनी राजकीय सूडनाट्य सुरू केले असून, पन्नीरसेल्वम यांच्यासह पक्षाच्या इतर बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, राज्यपाल सत्ता स्थापनेबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष
लागलेले आहे.

जयललिता यांचे नाव वगळले

न्यायालयाने शशिकला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षांची शिक्षा सुनावल्यांनतर शशिकला यांनी प्रथम त्यांचे विश्‍वासू सहकारी ई. के. पलनीसामी यांच्याकडे पक्षाची सुत्रे दिली. त्यानंतर ओ पन्नीरसेल्वम यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी शशिकला यांच्यासह सुधाकरन आणि इल्वरासी यांनाही चार वर्षांचा कारावास आणि 10-10 कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जयललिता यांचा मृत्यू झाला असल्याने त्यांचे नाव खटल्यातून काढून टाकण्यात आले आहे. न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला यांनी कुंवाथर येथील एका रिसॉर्टमध्ये आमदारांची तातडीची बैठक नेता निवडी बोलावली होती. तर न्यायालयाच्या निर्णयानंतर ओ पन्नीर सेल्वम यांच्या घरासमोर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.

शशिकला पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने पोलिसांनी गोल्डन बे रिसॉर्टवर जाऊन शशिकला यांचा ताबा घेतला. यापुर्वी बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी त्यांनी सहा महिने कारावास भोगला असल्याने आता साडेतीन वर्षे शशिकला यांना कारागृहात काढावी लागतील. या खटल्यातून मृत्यू झाल्याने जयललिता यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे.

दहा वर्षे पत्ता कट

सर्वोच्च न्यायालयाने सांगीतले आहे की त्यांनी जाऊन प्रथम समर्पण करायचे आहे. आता त्यांच्याकडे फक्त पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा एकमेव पर्याय आहे. मात्र त्यासही वेळ लागू शकतो. आता शशिकला यांना दहा वर्षांपर्यंत कुठलेही राजकीय पद मिळू शकत नाही. शिवाय सहा वर्षापर्यंत निवडणूकही त्या लढू शकणार नाहीत. पोलिसांच्या स्वाधीन होऊन कारागृहात जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहीला नसून त्या आता मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत.