शरद पवारांनी फसवा-फसवी केली तर आम्ही बघून घेऊ – उदयनराजे भोसले

0

सातारा : शरद पवारांनी फसवा-फसवी केली तर आम्ही बघून घेऊ, असा इशाराच ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे . राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आज कर्मवीर जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी सातारा दौऱ्यावर आले आहेत. पवारांशी बंद खोलीत चर्चा केल्यानंतर गाडीत बसताना खासदार उदयनराजे यांनी हा इशारा दिला आहे.

खासदार उदयनराजे यांना सध्या राष्ट्रवादीकडून साताऱ्यासाठी तिकीट दिले जाईल की नाही? याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी सातारा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची भेट घेतली. पण या भेटी दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी एका बाजूला आणि खासदार उदयनराजे वेगळ्या बाजूला अशी परिस्थिती सातारा विश्रामगृहाच्या परिसरात पाहायला मिळाली.यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दिपक चव्हाण हे उपस्थित होते.

उदयनराजे जेंव्हा पवारांच्या गाडीत बसतात..

उदयनराजे विश्रामगृहाच्या बाहेर आल्यानंतर अनावधानानं चुकून शरद पवार यांच्याच टोयाटो लेक्सस गाडीत बसण्याचा प्रयत्न करताना दिसले. परंतु, लगेचच आपली चूक त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर ‘माझी आणि पवार साहेबांची एकच गाडी आहे’ असं गमतीने म्हणत ‘दोन्ही गाड्याचा रंग सारखाच’ असल्यानं ही चूक झाल्याचं त्यांनी म्हटलं.

Copy