शमीच्या फोटोच्या निमित्ताने फाटलेला बुरखा

0

खरंतर हा विषय इतका महत्त्वाचा आहे का? मुस्लीम समाजाच्या समोर शमीच्या बायकोने काय कपडे घालावे, बुरखा घालावा की, नाय? हे खरे प्रश्‍न आहेत का? शिक्षणाचा प्रश्‍न, रोजगाराचा प्रश्‍न, खोट्या अतिरेकी केसेसचा प्रश्‍न, सामाजिक बहिष्काराचा प्रश्‍न असे कितीतरी गंभीर आणि भयंकर प्रश्‍न आज या समाजासमोर आ वासून उभे आहेत. त्या विषयावर हे कट्टर समर्थक, हे मुल्ला-मौलवी लोक कधी बोलतात का? तो बिचारा नजीब गेल्या 2 महिन्यांपासून गायब आहे. दिसलं यातलं कोणी, त्याबद्दल आवाज उठवताना?

धार्मिक भावनेच्या नावाखाली होत असलेल्या टीका आणि अश्‍लील कमेंट्सची अनेक उदाहरणे आपण निरंतर पाहत असतो. धर्म किंवा जात कुठलीही असो त्यात पारंपरिक विचाराला धरून भावना दुखावल्याच्या गप्पा हाणणारे ढिगाने विचारवंत आज सोशल मीडियावर तयार होत आहेत. अर्थातच मला कुठल्याही एका स्पेसिफिक धर्माच्या परंपरेवर बोट ठेवायचे नाही. मात्र, हे उदाहरण ताजे असल्याने यावर बोलणे आवश्यक आहे. सध्या चर्चेतला मुद्दा म्हणजे टीम इंडियातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फेसबुक अपलोड केलेल्या फोटोचा. शमी ज्यावेळी संघात खेळत असतो तेव्हा तो भारतीय असतो. मात्र, ज्यावेळी तो सोशल मीडियावर फोटो अपलोड करतो त्यावेळी मात्र तो मुस्लीम होऊन जातो आणि त्याला धर्माचे बारीक गोडवे ऐकवत ‘तू कसा धर्मभ्रष्टी आहेस’ याचे दाखले दिले जातात.
शमीने पत्नीबरोबरचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला. या फोटोवर अनेक धार्मिक कट्टरतावाद्यांनी शमीच्या पत्नीच्या कपड्यांवरून अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या. शमीच्या पत्नीने परिधान केलेल्या कपड्यांवर आक्षेप घेत विरोध केला आणि अजूनही होत आहे. अनेकांनी अश्‍लील आणि आक्षेपार्ह कमेंट करण्यास सुरुवात झाली. ‘तू मुस्लीम आहेस, पत्नीला झाकून ठेव. हाशिम आमला, मोईन अलीकडून काहीतरी शिक. इरफान पठानकडून शिक’ असा सल्ला काहींनी त्याला दिला. पत्नीच्या पोशाखावरून कट्टरपंथीय मानसिकतेच्या लोकांकडून अत्यंत खालच्या पातळीची टीका सहन करीत असलेल्या शमीने मात्र टीकाकारांना चोख उत्तर दिले. ‘माझी पत्नी आणि मुलगी हे माझे आयुष्य आहेत. काय करावे किंवा काय करू नये? हे मला चांगले ठाऊक आहे’ असे शमीने म्हटले आणि एकच सणसणीत चपराक लावली. त्याच काय चुकलं? हाच एक सवाल आहे. देशात आणखी मोठे मुद्दे आहेत. आशा करतो की, कमेंट करणार्‍यांची समज वाढेल, अशा शब्दांत मोहम्मद कैफने शमीच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट करणार्‍यांना झोडपून काढले तर त्याच्यावरही टीकेचा भडीमार झाला.
या गोष्टीवर प्रकाश टाकताना माझा मित्र आणि एक चांगला लेखक असलेल्या मोहसीन शेखने फेसबुकवर अशा बोरूबहाद्दरांची चांगलीच वाट लावली आहे. अर्थात त्याचं हे स्टेटस फार बोलून जातं. तो म्हणतो, ‘महंमद शमीच्या पत्नीचे बुरखालेस फोटो काय आले, कट्टर इस्लामिक कार्यकर्ते बुडाला आग लागल्यागत पेटले. कट्टरतेच्या चिखलात लोळणार्‍या या लोकांनी या नवपरिणीत जोडप्याला इथं सोशल मीडियावर अक्षरशः शिव्या आणि दूषणं दिली. धर्माच्या पालनाची अक्कल त्याला शिकवायचा प्रयत्न त्यांनी केला. बरं या आगीत अनेक मुल्ला-मौलविंनी वेगवेगळ्या चॅनेलवर जाऊन तेल ओतायचंच काम केलं. पण, या देशाचं संविधान त्याला आणि त्याच्या पत्नीला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन्सचा पूर्ण अधिकार आणि मुभा देते, हे मात्र हे लोक विसरले. खरंतर हा विषय इतका महत्त्वाचा आहे का…? मुस्लीम समाजाच्या समोर शमीच्या बायकोने काय कपडे घालावे, बुरखा घालावा की नाय? हे खरे प्रश्‍न आहेत का… शिक्षणाचा प्रश्‍न, रोजगाराचा प्रश्‍न, खोट्या अतिरेकी केसेसचा प्रश्‍न, सामाजिक बहिष्काराचा प्रश्‍न असे कितीतरी गंभीर आणि भयंकर प्रश्‍न आज या समाजासमोर आ वासून उभे आहेत. त्या विषयावर हे कट्टर समर्थक, हे मुल्ला-मौलवी लोक कधी बोलतात का? तो बिचारा नजीब गेल्या 2 महिन्यांपासून गायब आहे. दिसलं यातलं कोणी की, त्याबद्दल आवाज उठवताना? सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या देशाचं संविधान इथल्या नागरिकांना त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार आचरण करायची मुभा देतं. म्हणून त्या बदल्यात त्याचा मानसन्मान करायची एक नैतिक जबाबदारी पण आपल्यावर येते. ती पूर्ण पाडणे हे आपलं कर्तव्य आहे. मिसेस शमीच्या कपड्यांपेक्षा अनेक ज्वलंत प्रश्‍न आहेत समोर. यावर या सो कॉल्ड कट्टरवाद्यांनी इतर सामान्य मुस्लीमांसोबत मिळून लक्ष देणं गरजेचं आहे. मोहसीनचे हे मत अगदीच तंतोतंत आहे. अशा मुद्द्यांवर परखडपणे बोलणारे लोकं फार कमी आहेत. अर्थातच दुसर्‍या धर्मांच्या काही विखारी तत्त्वांनी या मुद्द्यालाही आपल्या पोळ्या भाजण्यासाठी वापरण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी आपल्या आत ढुंकून पाहणे देखील आवश्यक आहे. एकूणच काय तर प्रत्येक धर्मातील कट्टर आणि विखारी प्रवृत्तींना आपल्या समाजातील आणि धर्मातील मूळ समस्या सोडविण्यासाठी ताकत वापरायला शिकणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे केवळ घोषणेला जोरात हो किंवा नाही म्हणून प्रतिसाद देणार्‍यांची संख्या अधिक दिसून येतेय. सगळ्या धर्मात पुरोगामी व धर्मांध लोक आहेत. यांच्यावर नियंत्रण कसे आणावे? हा मोठा प्रश्‍नच आहे. खरंतर बायकांना बुरखे घालण्यापेक्षा बायकांकडे माणूस म्हणून पाहायला शिकणे आवश्यक आहे. एखाद्या खेळाडूच्या पत्नीचा फोटो पाहून इतकी अस्वस्थ होणारी टोळी सानिया मिर्झा खेळताना किंवा मुस्लीम अभिनेत्री अभिनय करताना किती कमालीची अस्वस्थ होत असेल? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. अर्थात यांच्यावरही टीका झाल्या आहेतच.

मशागत- निलेश झालटे
9822721292