शमीचे टीकाकारांना उत्तर

0

नवी दिल्ली – टीम इंडियातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पत्नीबरोबरचा एक फोटो फेसबुकवर शेअर केलाय. मात्र या फोटोवर अनेक धार्मिक कट्टरतावाद्यांनी शमीच्या पत्नीच्या कपड्यांवरून अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या. त्यामुळे याची चर्चा होत आहे. शमीच्या पत्नीने परिधान केलेल्या कपड्यांवर आक्षेप घेत विरोध करायला सुरुवात केली. इतकेच नाहीतर अनेकांनी अश्लिल आणि आक्षेपार्ह कमेंट करण्यास सुरुवात झाली. पत्नीच्या पोशाखावरुन कट्टरपंथीय मानसिकतेच्या लोकांकडून अत्यंत खालच्या पातळीची टीका सहन करत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. माझी पत्नी आणि मुलगी माझे आयुष्य आहेत. काय करावे किंवा काय करु नये हे मला चांगले ठाऊक आहे. आपल्याला स्वत:मध्ये डोकावून आपण किती चांगले आहोत हे पाहिले पाहिजे असे टि्वट शमीने केले आहे. 23 डिसेंबरला शमीने त्याच्या फेसबुकवर अकाऊंटवर पत्नी आणि मुलीसोबतच एक फोटो पोस्ट केला होता.

फोटोवरुन आक्षेपार्ह टीका
आपल्या अचूक गोलंदाजीने विरोधी संघांच्या फलंदाजांना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी घाम फोडतो. मात्र या गोलंदाजाच्याच सोशल मीडियावर दांड्या गुल झाल्याचे मागच्या तीन दिवसांत दिसून आले. पत्नीच्या पोशाखावरुन शामीला कट्टरपंथीयांनी लक्ष्य केले आहे. अत्यंत आक्षेपार्ह टीकाटिप्पणी सुरु झीली. तु मुस्लिम आहेस, पत्नीला झाकून ठेव, हाशिम आमला, मोईन अलीकडून काहीतरी शिक असा सल्ला काहींनी त्याला दिला. शामीच्या त्या फोटोवर 1500 पेक्षा जास्त कमेंट आल्या. सोशल मीडियावर जसे विरोधक उभे राहिले तसेच समर्थकही समोर आले.

सोशल मीडियावर वादंग
मोहम्मद शमीने आपली पत्नी हसीन जहान हिच्यासोबतचा एक फोटो आपल्या फेसबूक पेजवर पोस्ट केला. मात्र या फोटोमुळे त्याला नसता मनस्ताप सहन करावा लागत आहे. या फोटोत शमीची पत्नी हसीनने एक चॉकलेटी कलरचा सुंदर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. स्लिव्हलेस प्रकारच्या या ड्रेसवरील नक्षी तसेच हसीनच्या गळ्यातील नेकलेसमुळे ती अतिशय सुंदर दिसत आहे. मात्र, तिचे हेच सौंदर्य काही कट्टर नेटिझन्सना बोचत असल्याचे फोटोखालील कमेंट्सवरून दिसून येत आहे. त्याचसोबत या फोटोवर कमेंट करणाऱ्यांचे दोन गट पडले असून ते एकमेकांचा विरोध करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने शमीच्या फोटोचा स्क्रीनशॉट ट्वीट करुन त्याला समर्थन दिले आणि धर्माच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. देशात आणखी मोठे मुद्दे आहेत. आशा करतो की, कमेंट करणाऱ्यांची समज वाढेल, अशा शब्दात मोहम्मद कैफने शमीच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना झोडपले आहे.

शमीने पुन्हा अपलोड केले फोटो
मोहम्मद शमीने 23 डिसेंबरला पत्नीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर शमीने आक्षेपार्ह कमेंट्सकडेही दुर्लक्ष केलं. मात्र, आज न राहून शमीने ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिली.
“हे दोघेही माझे आयुष्य आणि आयुष्याचे सोबती आहेत. मला चांगले माहित आहे की, काय करायला हवे आणि काय करु नये. आपण स्वत:मध्ये डोकावून पाहिले पाहिजे की, आपण किती चांगले आहोत.”, असे ट्वीट करत शमीने आपले मौन सोडलं आणि टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी शमीने पत्नी आणि मुलीसोबतचे आणखी काही फोटो फेसबुक, ट्विटरवर शेअर केले. शिवाय, ट्विटर टाईमलाईन फोटोही पत्नी आणि मुलीसोबतचा ठेवला आहे.