शबरीमाला मंदिराच्या निर्णयाबाबत फेरविचार याचिका

0

थिरुअनंतपूरम- केरळच्या सुप्रसिद्ध शबरीमला मंदिराचे दरवाजे सुप्रीम कोर्टाने महिलांसाठी खुले केल्यानंतर, या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. नॅशनल अय्यप्पा डिव्होटीज असोसिएशनच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली असून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय विकृत नसला तरी अस्वीकारार्ह व अयोग्य असल्याची तक्रार करण्यात आली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बोलावलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी घेतला आहे.

मंदिराच्या प्राचीन परंपरा टिकाव्यात आम्हाला वाटत असल्याचे पंडलम या शाही कुटुंबाचे प्रवक्ते आर. आर. वर्मा यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कशी अमलबजावणी करावी यावर चर्चा करण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराची ऐतिहासिक परंपरा जतन करावी अशी अय्यप्पाच्या भक्तांची मागणी असून त्यासाठी निदर्शनेही करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सनातन धर्माच्या परंपरांचं पालन करावं यासाठी करण्यात आलेल्या या निदर्शनांमध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली नसल्याने सीपीआय (मार्क्सवादी) च्या विरोधात काँग्रेस व भाजपा या दोघांनी टिकेची झोड उठवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठानं 4 – 1 अशा फरकानं शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा असा निकाल दिला होता. अनेक शतकांच्या या परंपरेचा अत्यावश्यक धार्मिक परंपरांमध्ये समावेश होत नसल्याचा निष्कर्ष सुप्रीम कोर्टानं काढला होता.