शनि अमावस्याला शनिमांडळ तीर्थक्षेत्रात शुकशुकाट

0

मंदिर बंदच; यात्राही रद्द
नंदुरबार:कोरोना साथीच्या आजारांमुळे नंदुरबार तालुक्यातील प्रति शनिशिंगणापूर समजल्या जाणार्‍या शनिमांडळ येथे शनि अमावस्यानिमित्त दरवर्षी भरणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. कोविड -19 विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून यात्रा न भरण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतलेला आहे. त्यामुळे शनिवारी श्री तीर्थक्षेत्र शनिमांडळला शनिवारी सर्वत्र शुकशुकाट होता.

नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ हे धार्मिक स्थळ आहे. तेथे श्री शनी देवतेचे प्राचीन मंदिर आहे. याठिकाणी शनि अमावस्या व शनि जयंतीला यात्रा भरत असते. देशात शनिदेवाचे मंदिरे ही शक्तिपीठे आहेत तर शनिमांडळ येथील मंदिर हे साडेसाती मुक्तपीठ म्हणून समजले जाते. दरवर्षी शनि अमावस्याच्या दिवशी येथे यात्रा भरत असते. यात्रेची तयारी आठ दिवसापासून करण्यात येते.
महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील भाविक शनिमांडळला शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तीभावाने येत असतात. परंतु सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे बंद असल्यामुळे यंदा यात्रा न भरण्याचा निर्णय श्री शनेश्वर संस्थान सार्वजनिक विश्वस्त मंडळाने घेतला आहे. त्यामुळे शनिवारी मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. अनेक भाविक भक्तांनी घरीच शनिदेवतेचे महात्मे, मंत्रजाप, आरती केली. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना भाविकांकडून करण्यात आली.