शनिवारी रद्द व नियमित स्थायी समितीची सभा

0

जळगाव । दोन महिन्यांनंतर स्थायी समितीची पहिलीच सभा शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाल्याने आचारसंहिता असल्याने 25 नोव्हेंबर 2016 रोजी आयोजित करण्यात आलेली स्थायी सभा रद्द करण्यात आली होती. ही रद्द झालेली स्थायी समितीची सभा शनिवारी सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता होणार आहे. यानंतर नियमित सभा दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे.

या दोघ सभांसमोर 13 विषय मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत. यात महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारत येथे वाहन तळावर व प्रवेशद्वारावर तसेच दुसर्‍या मजल्यावरील सभागृह या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची आवश्यकता असल्याने येथे सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महानगर पालिकेत कार्यालयीन कामासाठी मोठ्या प्रमाणात नागरीकांची वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. महासभा, स्थायी समितीच्या बैठकीच्या वेळेत सभागृहात बाहेर व्यक्तींनी येवून गोंधळ केल्यची घटना घडलेली आहे. यामुळे सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यासोबतच गेंदालाल मिल परिसरात वाहने व भंगार झालेली साहित्येच्या सुरक्षतेसाठी व हंजीर बायोटेक खत निर्मीती प्रकल्प या जागेवरील साहित्याच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक नेमणुक करणे आवश्यक असून यासाठी एकूण 19 सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असल्याने त्यांच्यां वेतनावर वार्षिक खर्च 2 कोटी 80 लाख 4 हजार 400 रूपये खर्च येणार असून याची निविदा प्रसिद्धी करण्यासाठी येणार्‍या खर्चांची मान्यता मागण्यात आली आहे. तसेच सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात ही सभा होणार आहे. यासह इतर 12 विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.