Private Advt

जळगावात शतपावली करताना सेवानिवृत्त अभियंत्यांचा मृत्यू

जळगाव :  सेवानिवृत्त अभियंता घराच्या छतावर शतपावली करत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते पडले व या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील जिल्हापेठ परीसरातील उदय कॉलनी परीसरात शुक्रवार, 10 रोजी रात्री आठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची
जिल्हापेठ परीसरात असलेल्या उदय कॉलनी येथे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता संजीव भास्कर पाटील (60) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जेवण करून दुमजलीवर छतावर शतपावली करण्यासाठी गेले असताना मोबाईलवर बोलत असताना अचानक तोल गेल्याने ते दुमजली छतावरून खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परीवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.