व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली जि.प.ची सर्वसाधारण सभा

0

कोरोनामुळे जि.प.च्या विकासकामांना लागणार कात्री: सदस्यांमध्ये नाराजी

जळगाव: सध्या जगभरात कोरोना महामारीचे संकट असल्याने सोशल डीस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, सचिव कमलाकर रणदिवे, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी विनोद गायकवाड आदींसह मोजके सदस्य उपस्थित होते. उर्वरित सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेआपली उपस्थिती दर्शवत प्रश्न मांडले. उपस्थित सदस्यांनी सभागृहात सोशल डीस्टन्सिंग ठेवले होते. सर्व सभापती आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच मत मांडले.

केंद्र, राज्य सरकारचे अभिनंदन
कोरोना संकटाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने सभेत केंद्र आणि राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

कोरोनामुळे विकासकामांना कात्री
कोरोनामुळे राज्य सरकारपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कोरोनामुळे शासनाने विकासकामांसाठी मंजूर निधीला कट लावला आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या विकासकामांना देखील यामुळे कात्री लागणार असल्याने सदस्यांनी चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे आरोग्यासाठी खर्च करणे आवश्यक असले तरी जिल्हा परिषदेने आवश्यक विकासकामांसाठीच्या निधीला कात्री लावू नये अशी मागणी जि.प.सदस्य मधुकर काटे, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नानाभाऊ महाजन यांनी केली.

पावसात नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी
मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला, यात शेतीसह अनेक नुकसान झाले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने त्याचे तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे यांनी केली.

प्रत्येक गटाला कोरोना निधी द्यावा
संपूर्ण जगावर असलेल्या कोरोना संकटाच्या काळात जिल्हा परिषद गटात आरोग्य विषयक कामांसाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला किमान एक लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी केली. प्रत्येक गटाला निधी उपलब्ध झाल्यास प्रत्येक गावात सॅनिटायझरसह वाटपासह आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे यावेळी सांगण्यात आले.

ग्रामपंचायतकडून कर्जवसुली नाही
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी म्हणून कर्ज घेतले आहे. मात्र अनेकवर्षं उलटून गेल्यानंतरही कर्जाची परतफेड केलेली नाही, अशा ग्रामपंचायतींकडून कर्जवसुली करण्यासाठी आणि कर्ज परतफेड न करण्याऱ्या ग्रामपंचायतवर काय कारवाई करणार याबाबत जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला अपेक्षित उत्तर न मिळाल्याने इतर सदस्यांनी अधिकऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कर्ज परतफेड न करणाऱ्या ग्रामपंचायतीने तारण धरलेली संपत्ती जप्त करावी अशी मागणी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली.

Copy