व्यावसायिकाच्या घरातून सव्वा तीन लाखांची चोरी

0

तळेगाव : पाथरगाव येथील एका किराणा व्यावसायिकाचे कुटुंब मुलाला मुलगी पाहण्यासाठी सोलापूर येथे गेले असता त्यांच्या घरी घरफोडी झाली. यात मुलाच्या लग्नामध्ये नवविवाहितेला देण्यासाठी बनवलेले सोन्याचे दागिने व इतर दागिने चांदीची भांडी असा सुमारे 3 लाख 23 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 2) पहाटे उघडकीस आली. सुरेश देवीचंद बोरा (वय 53, रा. मावळ) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश आणि त्यांचा परिवार त्यांच्या मुलांसाठी मुलगी बघण्यासाठी शनिवारी (दि. 1) सकाळी सोलापूरला गेले. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटातून मुलाच्या लग्नासाठी बनवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने, इतर दागिने व चांदीची भांडी असा सुमारे 3 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास सुरेश घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून कामशेत पोलीस तपास करीत आहेत.