व्यसनामुळे कॅन्सरला मिळतेय आमंत्रण

0

भुसावळ । डॉक्टर एका वेळेस रुग्णांवर उपचार करुन एकाच रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. मात्र रेल्वे चालक सावधानता बाळगून हे एकाच वेळी हजारो प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास घडवून आणतात. मात्र रनिंग स्टाफ कर्मचार्‍यांना रेल्वेत वेळ काढण्यासाठी तसेच रात्रभर जागे राहण्यासाठी व्यसन करावे लागते. यातूनच कर्मचारी व्यसनाधिनतेकडे वळतात. 40 टक्के पुरुषांना कर्करोगाची लागण हि तंबाखू, गुटखा तसेच धुम्रपानाच्या सवयीमुळे होत असते. मात्र यामुळे काहींना खोकला सुरु होऊन टि.बी आजाराप्रमाणेच लक्षणे वरवर दिसत असल्यामुळे डॉक्टरांकडून देखील चुकीचे उपचार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कुठल्याही आजारावर उपचार घेताना 15 दिवसांत काहीच फरक न जाणवल्यास काहीतरी वेगळा आजार असल्याची शक्यता असते त्यामुळे यासंदर्भात तज्ञ डॉक्टरांकडूनच सल्ला घेऊन उपचार करण्याचे आवाहन कर्करोग तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी केले.

हास्ययोगासह तणावमुक्तीचे धडे
येथील रेल्वेच्या रंगभवन सभागृहात रनिंग रुम स्टाफतर्फे कर्मचार्‍यांच्या परिवारासाठी तणावमुक्ती शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. चांडक बोलत होते. याप्रसंगी मंचावर मोहन चौधरी, सीसीआरसीपी एस.के. सावकारे, सीसीआर युनुस खान, एस.के. अग्रवाल, एम.एस. राऊत, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता परिचालक पी.के. बंच उपस्थित होते. यावेळी कर्मचार्‍यांच्या परिवारातील सदस्यांना तणावमुक्तीचे धडे देण्याचे आले यामध्ये मोहन चौधरी यांनी हास्ययोगासह ध्यान, धारणे संबंधी मार्गदर्शन केले.

घाणीमुळेच फैलावतात आजार
यावेळी डॉ. चांडक म्हणाले की, तंबाखू तसेच गुटख्याचे सेवन करणार्‍यांना तोंडात जखम तयार होते. तसेच पांढर्‍या व पिवळ्या रंगाचे डाग तोंडावर दिसून येतात. धुम्रपानामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम तर होतोच शिवाय आपल्याकडून हि लक्षणे आपल्या मुलांमध्येही जाणवतात. मात्र आपल्या पुढील पिढीला यापेक्षाही जास्त तणावाला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे मुलांसमोर एक चांगला आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुटखा सेवन करणारे व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वारंवार थुंकताना दिसतात या थुंकीतूनच परिसरात जिवाणूंचा फैलाव होतो. त्यामुळे अशा व्यक्तिंना आळा घाला. बहुतांश आजार हे घाणीमुळेच उद्भवतात. स्वच्छ भारत अभियान केवळ फोटोसेशन पुरतेच मर्यादीत न राहता व्यापक स्वरुपात राबविल्यास आजारांना आळा बसू शकत असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी अनंत कुळकर्णी, एस.एस. आवारकर, डी.डी. महाजन, वाय.ए. कोल्हे, जे.एस. पाटील, एस.के. असलम, महेेश ठोके, एम.पी. चौेधरी आदींनी परिश्रम घेतले.

जिवनशैलीत बदल आवश्यक
सध्याच्या युगात स्मार्ट वर्कचा जास्त बोलबाला आहे. त्यामुळे घाम गाळून काम करण्यापेक्षा एका ठिकाणी बसून काम करण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. तसेच फास्ट फुडचा अतिरेक यामुळे तणाव निर्माण होऊन व्यक्ती व्यसनाकडे वळतात तर महिलांमध्ये असलेल्या लठ्ठपणामुळे देखील कर्करोगाची लागण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आजची बदलती जीवनशैली हि घातक असून जीवनात काही प्रमाणात का होईन ग्रामीण शैलीचे अनुकरण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. चांडक यांनी केले.