व्यथा तमाशा फड मालकांच्या…

0

धुळ्याच्या बसस्टँडवरून धुळे जिल्हा कारागृहाकडे गेलो की टेक्निकल हायस्कुलच्या बाहेर तमाशाचे फड चालवणारे मालक बसलेले दिसतात. कार्यक्रमाच्या सुपार्‍या घेण्यासाठी ओळीने वेगवेगळ्या फडांचे मालक तिथे जमलेले असतात. त्या रस्त्यावरून एकदोन चकरा मारल्यानंतर त्यांच्याशी बोलण्याची उत्सुकता चाळवली मग जाऊन त्यांच्याशी बोलायचे ठरवले. बाकी ठिकाणी गर्दी होती. त्यामुळे एकटे बसलेल्या एका फड मालकांकडे वळलो. भीमा व नामा हे त्यांच्या जोडगळीचे नाव. अंजनाळे हे यावल तालुक्यातील त्यांचर गाव. भीमा नामा 30 वर्षांपासून फड चालवतात. तुमच्या फडात किती लोकं आहेत असा प्रश्न विचारल्यावर भीमाभाऊंनी बोलायला सुरुवात केली. आमचा 25 ते 30 जणांचा फड आहे. महिन्यात किमान 15 कार्यक्रम होतात. वेगवेगळ्या तिथी, चंपाषष्ठी, आखाजी पंचमी, गुढीपाडवा पंचमी गावोगावच्या जत्रा हे सगळे कार्यक्रमाचे दिवस असतात. जळगाव,धुळे आणि नंदुरबार या खान्देशातील भागात आमचे कार्यक्रम होतात. तुम्ही कोणकोणते कार्यक्रम करतात. असे विचारल्यावर भीमाभाऊ सांगतात. गणगौळण, वगनाट्य, हागणदारी मुक्ती, हुंडाबळी, व्यसनमुक्ती या व अशा अनेक विषयांवर आम्ही कार्यक्रम करत असतो. तरुणांना हिंदी गाण्यांचे असलेले आकर्षण त्यामुळे हिंदी गाण्यांवर डान्स असे कार्यक्रमही घ्यावे लागतात.

नोटबंदीचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला आहे? असे विचारल्यावर भीमभाऊंनी त्यांच्या व्यथा मांडायला सुरवात केली. नोटबंदीने आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. यावेळी सुपार्‍या कमी मिळाल्या त्यामुळे कार्यक्रम कमी झालेले आहेत. कित्येक ठिकाणी जत्रा झाल्या पण आमचे कार्यक्रम झाले नाहीत. पैसा नसल्याने सुपार्‍या मिळाल्या नाहीत. जिथे सुपार्‍या मिळाल्या तिथे पुरेसे पैसे मिळाले नाहीत. एका कार्यक्रमाचे साधारण 25 ते 26 हजार रुपये होतात. त्यामुळे एकगठ्ठा 100 च्या इतक्या नोटा लोकांकडे उपलब्ध नसतात. त्यामुळे काही ठिकाणी लोकांनी जुन्या नोटा दिल्या. जुन्या नोटा नको म्हंटलं तर काहीजण चेक देतो म्हणत होते. चेक घेऊन काय करणार? आमचे बँकेत अकाउंटच नाहीये. मग चेक घेऊन काय करायचे. मग थोडे पैसे सुट्टे घ्यायचे आणि बाकीच्या जुन्या नोटा घ्यायच्या असे कार्यक्रम केले. सुट्टेपैसे म्हणजे 100 च्या नोटा जपून वापराव्या लागतात. एखाद्या ठिकाणी गाडी थांबली आणि कुणाला काही खावेसे वाटले तर त्याला 1000 किंवा 500 रुपये दिले तरी हॉटेलवाला ते स्वीकारत नसे. तो तरी काय करणार त्याच्याकडे सुट्टे असायला हवे. काही ठिकाणी उधारीवर कार्यक्रम करावे लागले. पण अजूनही उधारी मिळालेली नाहीये. काहीजण आज देतो उद्या देतो असे म्हणत टाळाटाळ करतायेत. त्यांच्या बॅगेतून त्यांनी कार्यक्रमाच्या नोंदीची डायरी काढली. व उधारीवर केलेल्या कार्यक्रमाची नोंद दाखवली. 8 नोव्हेंबरला कार्यक्रम झालेला होता. 4 हजार रोखीने दिलेले होते. 22 हजार रुपये येणे बाकी अशी नोंद त्या डायरीत होती. थांबा तुमच्यासमोरच फोन लावतो असे म्हणून त्यांनी एका व्यक्तीला फोन लावला. भिमाभाऊ बोलतोय भाऊ, तितके पैसे पाठवा. पलीकडील व्यक्ती, अजून मिळाले नाही का? अमुक आलाय तुम्हाला पैसे द्यायला. भिमाभाऊ: नाही ना अजूनतरी कुणी आलेलं नाहीये. त्यांना सांगा पैसे द्यायला. सध्या खूप तंगी आहे. पलीकडील व्यक्ती, हो सांगतो. इतकं बोलून पलीकडल्या व्यक्तीने फोन कट केला. हे पहा असे करतात एकमेकांवर ढकलतात आणि पैसे देण्याची टाळाटाळ करतात.गेल्या दोन महिन्यात कार्यक्रमांची संख्या खूपच कमी झालेली आहे. पूर्वी महिन्याला किमान 15 कार्यक्रम व्हायचे. दोन महिने मिळून हि संख्या 30 ते 35 कार्यक्रम इतकी असायची. पण ह्या नोटाबंदीच्या 2 महिन्यात कसेबसे 15 कार्यक्रम झालेत. पूर्वी जत्रा किंवा तिथी नसली तरी गावातील तरुण मंडळी वर्गणीतून पैसे जमवून कार्यक्रम ठरवत असत. परंतु आता पैसेच नसल्याने तेही कार्यक्रम मिळालेले नाहीयेत. आम्ही कुठेही असू पण आम्हाला या ठिकाणी आठवड्यात यावेच लागते. कारण आजूबाजूच्या गावातील लोकं कार्यक्रम ठरवायला इथेच येतात. त्यामुळे तोही खर्च लागतोच.

भिमाभाऊंकडून उठलो व अजून एका फड मालकांकडे गेलो. तो फड मालक तरुण दिसत होता. रतनभाऊ सोमनाथभाऊ नगरदेवळेकर असे त्यांचे नाव होते. त्यांना येण्याचा उद्देश सांगितला त्यांनीही तीच कहाणी सांगितली. त्यांचा फड 50 वर्ष जुना आहे. वडीलांपासून चालत आलेला. आम्ही चार भाऊ आहोत सगळे याच व्यवसायात आहोत. ते म्हणाले नोटबंदीमुळे व्यवसायाची वाट लागली आहे. सुपार्‍या नाही कार्यक्रम नाही. पण तरीही 30 जणांचा फड सांभाळावा लागतोय. नोटबंदीमुळे झालेली ओढाताणच इतकी आहे की आता पोलिसही त्रास देताहेत.

चाळीसगाव जवळ पोलिसांनी गाडी पकडलीय. सोडत नाहीयेत, 2000 रुपये मागताहेत. एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचे आहे पण आता उशीर होईल असे वाटतेय. मी एका मित्राला फोन केला तो चाळीसगावला पोलीस आहे. त्याला सगळी परिस्थिती सांगितली. त्याने तिथे फोन केला. पण आधीच 200 रुपये घेऊन गाडी गेल्याचे त्याने सांगितले. आधी कधीही पोलिसांनी असा त्रास दिला नाही हेही रतनभाऊ म्हणाले. काही लागले तर सांगा असे म्हणून मी तिथून निघालो.

– राहुल बोरसे