व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना

0

मुक्ताईनगर : राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्याने दिलेली सेवावृत्ती ही त्याच्या जीवनातील सुवर्णकाळ ठरते व त्यातूनच त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत आपले ज्ञानचक्षू जागृत ठेवले पाहिजे तरच राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक चळवळ नसून ते सेवाभावी व्रत आहे व त्याचा स्विकार विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेतून करावा. यातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची निर्मिती होत असल्याचे प्रतिपादन जी.जी. खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी केले. येथील जी.जी. खडसे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एककाचे हिवाळी शिबीर घोडसगाव येथे 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात
आले आहे.

मान्यवरांनी केले मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्व स्पष्ट केले. शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक गणेश महाजन यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपण सैन्य दलात भरती झाल्यानंतर कसे घडलो, हे सांगतांना प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करता येते, याचे उदाहरणासह विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. पी.पी. चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. आर.टी. चौधरी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. वंदना चौधरी व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन उमेश पाटील यांनी तर आभार विश्‍वजित पाटील यांनी मानले.