वॉटरग्रेसचा मनपा प्रशासनावर पलटवार

0

मनपाने एकतर्फी दंडात्मक कारवाई केल्याचा साफसफाई मक्तेदाराचा खुलासा


जळगाव– शहरातील साफससफाई आणि कचरा संकलनासाठी मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी एकमुस्त ठेका दिला आहे.मात्र साफसफाईबाबत अनेक तक्रारी असल्यामुळे तसेच समाधानकारक साफसफाई होत नसल्याने मनपा प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येवू नयेे अशा आशयाची अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला होता. त्यावर मक्तेदाराने प्रशासनाकडे सोमवारी पाच पानाचा खुलासा सादर केला असून एकतर्फी दंडात्मक कारवाई सुरु आहे.यासह अनेक मुद्द्यांवर खुलाशात प्रशासनावर पलटवार केला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

पाच पानाचा खुलासा

मनपाने शहरातील दैनंदिन साफसफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटींचा एकमुस्त ठेका दिला आहे. ऑगस्ट महिन्यापासून मक्तेदाराच्या माध्यमातून साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम सुरु आहे. मात्र साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने मनपा प्रशासनाने वारंवार मक्तेदाराला नोटीसा दिल्या.तरीही कामकाजात सुधारणा होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच मनपा पदाधिकार्‍यांसह काही नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त करत साफसफाईचा एकमुस्त मक्ता रद्द करावा अशी मागणी केली होती.त्यामुळे प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येवू नयेे अशा आशयाची अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला होता. दरम्यान,मक्तेदाराने सोमवारी मनपा प्रशासनाकडे पाच पानाचा खुलासा सादर केला.

काय आहे खुलासा

साफसफाई मक्तेदाराने मनपा प्रशासनाकडे खुलासा सादर केला आहे.यात त्यांनी मनपा प्रशासनावरच पलटवार केलेला आहे. एकतर्फी दंडात्मक कारवाई सुरु आहे.खर्च भागत नाही,आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मनपातर्फे बेकायदेशीर दंड,बेकायदेशीर कपात करण्यात येत आहे.घंटागाड्याची सर्व्हिस न केल्यामुळे वाँरटी संपून गेली आहे.85 घंटागाड्यापैकी 15 वाहने बंद आहेत.7 कॉम्प्कटरपैकी 3 बंद आहेत.2 डंपर बंद आहेत.कचर्‍याचे वजन करण्यासाठी मनपाने 4 वजन काटे उपलब्ध करुन दिले नाही.संकलन केंद्र उपलब्ध नाहीत.दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे असे मक्तेदाराने खुलाशात म्हटले आहे.

अखेर फाईल सापडली

साफसफाई मक्तेदाराने सोमवारी आरोग्य विभागाकडे खुलासा सादर केला होता.मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली होती.तसेच फाईल देखील गहाळ झाली होती.अखेर रात्री उशीरापर्यंत त्या फाईलचा शोध घेण्यात आला.अखेर ती फाईल सापडली असून उपायुक्तांच्या टिपणीनंंतर आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.मक्तेदाराने अनेक मुद्द्यांवर मनपावरच ताशेरे ओढले आहे.त्यामुळे आता प्रशासन काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Copy