वैद्यजी ‘महाराष्ट्रा’चा बुद्धिभेद का करताय?

0

दिल्लीतील केंद्रीय सत्ता बहुमताने भारतीय जनता पक्षाकडे आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेच्या घोड्यावर बसून रा. स्व. संघ व त्यांच्या परिवारातील मंडळी नको त्या कल्पनांचे पतंग हवेत उडवत जनतेत वैचारिक संभ्रम निर्माण करत आहेत. गेल्या सप्ताहात नागपूर शहरात असेच काहीसे घडले. विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या ‘विदर्भ मिरर’ या साप्ताहिकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी ‘महाराष्ट्राची चार राज्ये करण्यात यावीत’, असे वक्तव्य करून मराठी जनमानसात बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मराठी जनतेत अशा कुठल्याही विचारांचा मागमूस नसताना मा. गो. वैद्य यांनी केलेले हे भाष्य मराठीभाषिक एकतेचा भेद करणारे असल्याने त्याची दखल घ्यावीच लागते.

मुळातच वैद्य हे वेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थक असल्याने त्यांच्या विचारात मराठी डावपेचांचा अभाव असून, मराठी राज्यात फुटीरता निर्माण करणार्‍या कटू डावपेचांचा प्रभाव दिसून येतो. दुसरी बाब म्हणजे ‘महाराष्ट्राची चार राज्ये करा’ असे म्हणताना आपण काही क्रांतिकारक विचारांची मांडणी करतोय, असा जो आविर्भाव आणलाय तोहि फुकाचाच आहे. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या प्रारंभ काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1955 साली ‘थॉटस ऑफ लिंग्विस्ट स्टेट’ या पुस्तकात चार राज्यांची कल्पना मांडली होती.

1950च्या दशकात भाषावर प्रांतरचनेच्या मांडणीवरून चाललेल्या वादंगावर भाष्य करताना डॉ. आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या प्रश्‍नावर विचार मांडताना म्हटले होते की, सध्याचे बहुभाषिक राज्य पहिल्यांदा बरखास्त करून महाराष्ट्राची विभागीय अशी चार राज्य बनवावीत. चार राज्यांची कल्पना मांडताना त्यांनी त्यात समाविष्ट होणारे भौगौलिक विभागही दिले होते. डॉ. बाबासाहेबांची चार राज्यांची योजना खालीलप्रमाणे होती.

1) महाराष्ट्र शहरराज्य – मुंबई – मुंबई बेटे आणि कार्यक्षम शहर राज्य बनण्यास आवश्यक असा लगतचा महाराष्ट्रातील काही भाग.
2) पश्‍चिम महाराष्ट्र – ठाणा, कुलाबा, रत्नागिरी, पुणे, उत्तर सातारा, द. सातारा, कोल्हापूर आणि कर्नाटकाला दिलेला मराठी भाषिकांचा विभाग.

3) मध्य महाराष्ट्र – डांग, पूर्व खानदेश, प. खानदेश, नाशिक, अहमदनगर औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यातील भाग आणि तेलंगणाला दिलेला मराठी भाषिकांचा विभाग.
4) पूर्व महाराष्ट्र – बुलडाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, चांदा, नागपूर, भंडारा आणि हिंदी राज्यांना दिलेला मराठी भाषिकांचा भाग.

1955 साली डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या या योजनेला एक प्रामाणिकपणा होता. भाषिक राज्यपुनर्रचनेत अडकलेल्या बहुभाषिकवादाच्या जंजाळातून मराठी समाजाची सुटका व्हावी असे त्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी चार राज्यांची कल्पना मांडली, तरी त्याचा कधी पाठपुरावा करायला आपल्या अनुयायांना सांगितले नाही. डॉ. बाबासाहेबांची मराठी अस्मिता वादातीत होती. म्हणूनच त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांना, मी व माझा पक्ष (शेड्युल कास्ट फेडरेशन) तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा शब्द दिला व तो पाळला. दुर्दैवाने 1956 सालीच डॉ. बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्याने मुंबईसहित महाराष्ट्राची निर्मिती ते पाहू शकले नाहीत.

आज अखंड महाराष्ट्रात काही असंतुष्ट विदर्भवाद्यांचा अपवाद वगळता सर्व मराठी भाषिक एकत्र नांदत असताना मा. गो. वैद्य यांनी चार राज्यांची मागणी लावून धरणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्थैर्याला चूड लावण्यासारखेच आहे. भाषिक तत्त्वावर राज्यांची निर्मिती करताना सर्वात जास्त अन्याय मराठी भाषिकांवरच करण्यात आला होता. याचा विसर मा. गो. वैद्य यांना झालेला दिसतोय. महाराष्ट्राची निर्मिती सहजासहजी झालेली नाही. पाच वर्षे आंदोलन 106 हुतात्मे दिल्यावर मराठी भाषिकांना आपले भाषिकराज्य मिळवता आले. त्या राजकीय संघर्षात ‘जनसंघ’ही सहभागी होता व तो संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होता. हा इतिहास मा. गो. विसरले का? द्वैभाषिक मुंबई राज्यात असलेले डांग, उंबरगाव, धरमपूर, वासदा हे मराठी भाषिक प्रदेश गुजरातला दिले. यामुळे सुमारे वीस लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात स्थान मिळालेच नाही. या अन्यायाविरोधात मा. गो. वैद्य कधी काही बोलले नाहीत. महाराष्ट्रात तथाकथित विदर्भवाद्यांची कोंडी होतेय म्हणून मा. गो. यांना वेदना झाल्या असतील तर मग गेली 60 वर्षे कानडी राज्यात बेळगाव पथ्यातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय उघड असताना कर्नाटकात जाऊन बेळगावचे एक स्वतंत्र राज्य करा, अशी मागणी त्यांनी का केली नाही? तीन कोटी नागरिकांचे एक राज्य व्हावे असे वैद्यांना वाटत असेल तर मग त्यांनी प्रथम उत्तर भारतीय पट्ट्यातील सर्व राज्यात जाऊन तशी मागणी करावी व मगच महाराष्ट्राला ज्ञानामृत पाजावे.

– विजय य. सामंत
9819960303