Private Advt

वेळेवर माहिती न देणार्‍या वनविभागाच्या अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई

यावल : माहितीचा अधिकारात वेळेवर माहिती न उपलब्ध करून दिल्याने राज्य माहिती आयुक्त के.एल.विष्णोई यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी एरंडोल यांना तीन हजार रुपये तर मुक्ताईनगर प्रादेशिक वडोदा, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा या वनपरीक्षेत्र अधिकारी यांना प्रत्येकी एक हजार रुपयाची शास्ती ठोठावली आहे.

दंडात्मक कारवाईने उडाली खळबळ
किनगाव, ता.यावल येथील खलील शहा कादर शहा व त्यांचा मुलगा सद्दाम शहा खलील शहा सन 2018 मध्ये माहिती अधिकारात वनविभागाच्या एरंडोल, मुक्ताईनगर प्रादेशिक वडोदा, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा विभागीय कार्यालयाने अनुसूचित झाडे (साग, खैर इत्यादी) वगळून इतर झाडांकरता मालकी प्रकरणात लाकूड वाहतुकीकरीत दिलेल्या मंजुरीचे आदेशाची प्रत व त्याप्रमाणे जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदार यांनी वृक्षतोडीसाठी दिलेल्या परवानगी आदेशाच्या प्रतीची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. ती त्यांना मिळाली नाही व ते अपिलात गेले. नाशिक राज्य माहिती आयुक्त खंडपीठात के.एल.विष्णोई यांनी 21 ऑक्टोबर 2021 रोजी या प्रकरणात निकाल देतांना वनपरीक्षेत्र अधिकारी एरंडोल जन माहिती अधिकारी बी.एस. पाटील यांनी तीन हजार रुपये तर जामनेरचे समाधान पाटील, चाळीसगावचे संजय मोरे, पारोळ्यातील आ.एस.दसरे, मुक्ताईनगरातील आशुतोष बच्छाव यांना प्रत्येकी एक हजार रुपये अशी शास्तीची कारवाई करण्याचे आदेश दिल्याने वनविभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.