Private Advt

विष प्राशन केलेल्या भुसावळातील ‘कुटुंब प्रमुखाचा’ मृत्यू

दारीद्य्रामुळे हात टेकत भुसावळातील भोळे कुटुंबियाने केले हेाते विष प्राशन ः दोघांची प्रकृती अत्यवस्थ

भुसावळ : लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्यानंतर जगण्याचा संघर्ष सुरू असताना पत्नीचे आजारपण व मुलासह मुलीच्या भवितव्याची ग्रासलेली चिंता व सततची आर्थिक विवंचना या चक्रव्युहात गुरफटलेल्या भुसावळात भोळे कुटुंबाने सामूहिकरीत्या उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याची घटना शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगरामागील गोकुळधाम रेसीडेन्सीत शुक्रवार, 10 रोजी रात्री उशिरा उघडकीस आली. कुटुंबातील तिघा अत्यवस्थांपैकी कुटुंबप्रमुख विलास भोळे (60) यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात आली. मंगळवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अखेर कुटुंब प्रमुखाची प्राणज्योत मालवली
रीक्षा चालक विलास प्रदीप भोळे (60), त्यांच्या पत्नी लताबाई विलास भोळे (52), मुलगी प्रेरणा विलास भोळे (28), मुलगा चेतन विलास भोळे (27, सर्व रा.वांजोळा रोड, प्रेरणा नगर) यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मंगळवार, 14 डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास विलास प्रदीप भोळे (60) यांची प्राणज्योत मालवली.

भुसावळात अंत्यसंस्कार
मयत विलास भोळे यांच्या पार्थिवावर शहरातील तापी काठावरील स्मशानभुमीत मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील भिरुड कॉलनीतील रहिवासी त्यांचे बंधू गोकूळ भोळे यांच्या निवासस्थानावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान मृत विलास यांचा मुलगा चेतन याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तोदेखील अंत्ययात्रेत सहभागी होता, अशी माहितीही नातेवाईकांनी दिली. भोळे कुटूंबातील लताबाई विलास भोळे (52) व प्रेरणा विलास भोळे (28) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.