विश्वासघाताची मालिका सरकारकडून सुरु; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आरोप !

0

नागपूर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून विधान सभेत भाजप आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर माध्यमांशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर आरोप केले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र अजूनही त्यांनी मदत दिलेली नसल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे. या सरकारने विश्वासघाताची मालिका सुरु केली असल्याचे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अधिवेशनात १६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. यावर देखील त्यांनी आक्षेप घेतला. आमचे सरकार असताना ८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या, त्यावर आक्षेप घेण्यात येत होते, आता तुमच्या सरकारच्या काळात १६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशा मांडल्या गेल्या असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यावर आक्षेप घेतले.