विश्रांतवाडीत आता पाकिटमारांचा सुळसुळाट

0

अल्पवयीन मुलांचा सहभाग; पोलिसांचा वचक नाही

येरवडा : विश्रांतवाडी परिसरात अवैध धंद्यापाठोपाठ आता अल्पवयीन मुले ही गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्याने परिसरात पाकिटमारांचा सुळसुळाट वाढला आहे. या भागातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.या भागात गावठी दारू धंद्यासह मटका, जुगार विळखा घातला आहे. त्यात चायनीज हॉटेल्सही तळीरामांचा अड्डा बनला आहे. पाकिटमारांची त्यात भर पडली असल्यामुळे नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

मेंटल कॉर्नर परिसरातील बसथांब्यावर रात्रीच्या वेळी कामगारांची संख्या अधिक असते. त्यातच शांतीनगर, राजीव गांधीनगर झोडपट्टी परिसर असल्याने रात्रीच्या सुमारास दारूड्यांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावरून पादचारी जात असताना दारूड्यांच्या दहशतीचा सामना नागरिकांना करण्याची वेळ येत आहे. पथदिवे हे बंद अवस्थेत असल्याने अंधाराचा गैरफायदा भुरटे चोर घेत आहेत. एखाद्या एकट्या व्यक्तीला हेरून तीन ते चार जणांचे टोळके हे अशा नागरिकास हेरून त्याच्याजवळील वस्तू चोरून नेण्याच्या तसेच चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास जबरदस्त मारहाण होण्याच्या घटना घडत आहेत. हाकेच्या अंतरावरच पोलीस स्टेशन असताना देखील अशा नागरिकांची तक्रार घेण्यास पोलीस कर्मचारी धजावत नसून फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर पोलीस स्टेशन उभारून फायदा काय? असा सवाल करण्यात येत आहे.

Copy