विशेेष सभा रद्द करण्याची जनाधारची मागणी

0

भुसावळ। भुसावळ नगरपालिका ही ‘अ’ दर्जाची पालिका असून 4 फेब्रुवारी रोजी विषय समिती सभापतींची निवड ठेवण्यात आली आहे. यापूर्वी विषय समिती सदस्यांमध्ये स्विकृत नगरसेवकांचा सहभाग घेतल्याने समिती सदस्यांची निवड रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे जनाधार पार्टीने केली होती. परंतु यासंदर्भात कुठलीही कारवाई न झाल्याने 4 रोजीची सभा स्थगित करण्याची मागणी जनाधार विकास पार्टीतर्फे करण्यात आली आहे.

‘क’ वर्ग पालिकेच्या तरतुदीनुसार सुचना
जिल्हाधिकार्‍यांनी विषय समिती सभापती निवडीसंदर्भात विशेष सभा 4 फेब्रुवारी रोजी घेण्याच्या सुचनेसंदर्भात पत्र दिले आहे. मात्र याअगोदर जनाधार पार्टीने समिती सदस्यांची निवडच रद्द करण्याची मागणी केली होती. यावर कुठलीही कारवाई जिल्हाधिकार्‍यांकडून करण्यात आलेली नाही. विषय समितीमध्ये फक्त निवडून आलेल्या नगरसेवकांनाच सदस्य होता येते. तरीदेखील यात स्विकृत नगरसेवकांना सदस्य घेतले आहे. तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमाप्रमाणे विषय समितीची सुचना ही यातील प्रकरण 3 मधील (4) व कलम 63 प्रमाणे काढणे आवश्यक आहे. त्यामध्ये कलम 63 मध्ये ‘अ’ वर्ग आणि ‘ब’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समितीच्या विशेष समिती रचनेबाबत स्पष्ट उल्लेख असतांनासुध्दा सभेची सुचना ही त्यानुसार न काढता ‘क’ वर्ग पालिकेच्या तरतुदीनुसार काढण्यात आली आहे. त्यामुळे ही अधिसुचना रद्द करण्यात येवून 4 रोजी होवू घातलेल्या विषय समिती सभापतीच्या निवडीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी जनाधार विकास पार्टीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जनाधारचे गटनेेता उल्हास पगारे यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना लेखी निवेदन सादर केले आहे.