विविध मागण्यांसाठी बँक कर्मचार्‍यांचा 28 रोजी संप

0

नवी दिल्ली । खासगी, परदेशी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे सुमारे 10 लाख कर्मचारी, अधिकार्‍यांनी 28 फेब्रुवारीस एक दिवसाचा संप पुकारला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा निर्णय घेतला आहे. देशातील नऊ कर्मचारी संघटना या राष्ट्रव्यापी संपात सहभागी होणार आहेत. नोटाबंदीच्या काळात केलेल्या कामाचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही, तो ताबडतोब द्यावा ही प्रमुख मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली आहे. दोन महिन्यात कर्मचार्‍यांना नोटा बंदीच्या काळातील मोबदला मिळालेला नाही. कामगार कायद्यात होणारे बदल, बँकांसमोरील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच नोटाबंदीच्या काळातील मोबदला द्या, यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. तसेच बँकामध्ये कायम स्वरुपी कामासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हा प्रकार तातडीने बंद करून कायम स्वरुपी तत्त्वावर कर्मचारी भरती करावी, अशी संघटनेची मागणी आहे.