विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांची चौकशी करा

0

नवापूर। नवापूर तालुक्यातील पर्यटन विकास योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. रोजगार हमी व पर्यटन विकास मंञी ना. जयकुमार रावल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवापूर जिल्हा नंदुरबार येथे सन 2011 मध्ये तत्कालीन मंञ्यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शासन निर्णय क्रमांक टीडीएस 201/10/प्र.क 782 पर्यटन दिनांक 31/12/2011 अन्वये शहरातील विविध पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता या निधीतून नवापूर शहरातील ईदगाह मस्जिद, मरिमाता मंदिर व तालुक्यातील करंजी येथे मिशन परिसरात विविध विकास कामे करायचे होते.

एक कोटी दहा लक्ष रूपयाची तरतूद
यापैकी ईदगाह मस्जिद व मिशन परिसरातील कामे काही प्रमाणात पूर्ण करण्यात आली आहेत. तर काही कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहे. या योजने अंतर्गत शहरातील मरिमाता मंदिराचा तिर्थक्षेञात समावेश करून परिसरात विविध विकास कामे करण्यासाठी एक कोटी दहा लक्ष रूपयाची भरीव तरतूद करण्यात आली होती. सदर कामाचे भूमिपूजन 2012 साली करण्यात आले होते. परंतु बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी व मक्तेदाराचा हलगर्जीपणामुळे आजपर्यंत मरिमाता मंदिर परिसराचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. तीन कामापैकी मंदिर परिसर व मिशन परिसरातील काम अधिकार्‍यांनी घाईगर्दीने केले. त्यामुळे ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

उच्चस्तरीय चौकशी करा
शहरातील हिंदू बांधवांचे श्रध्दा व आस्थास्थान असलेल्या मरिमाता परिसराला शासनाने भरीव निधी देऊन ही अद्याप कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट कामाला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व मक्तेदारावर कडक कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी राष्ट्रीय ग्राहक, पर्यावरण व वन संरक्षण समितिचे जिल्हा अध्यक्ष जयंतीलाल अग्रवाल यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर काम अपूर्ण अवस्थेत असल्याने विटा व स्टील चोरीला जात असल्याने याची चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे