विवाहितेची मंगलपोत लांबविणारे बच्चे कंपनी पोलिसांच्या ताब्यात

0

अर्धातास होमगार्डसह जिल्हापेठ पोलिसांना दोघा अल्पवयीन मुलांनी पळविले

जळगाव:शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून विवाहितेची मंगलपोत लांंबविणाची घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. मंगलपोत लांबविणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना गस्तीवर असलेल्या सतर्क दोन होमगार्ड कर्मचार्‍यांसह जिल्हापेठ पोलिसांनी अर्धातासातच पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून विवाहितेची तोडून नेलेली मंगलपोत हस्तगत करण्यात आली असून दोघा अल्पवयीन मुलांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गस्तीवरील सतर्क होमगार्डनी केला पाठलाग

विटनेर येथील सासर व पाचोरा तालुक्यातील मोंढाळे येथील माहेर असलेल्या शुभांगी राहूल ठोंबरे वय 25 या त्यांचा भाऊ गोलू विरभान एरंडे वय 20 रा. मोंढाळे ता.पाचोरा याच्यासोबत जळगाव शहरातील हरिविठ्ठल येथे मामाकडे आल्या होत्या. मामाकडील काम आटोपल्यावर ठोंबरे ह्या बुधवारी सकाळी पुन्हा मोंढाळे येथे माहेरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. याठिकाणी प्लॅटफार्मसमोर मोंढाळ्याकडे जाणारी बस उभी राहिल्याने ठोंबरे ह्या भावासोबत बसमध्ये चढत होत्या. चढत असतांना दोन अल्ववयीन मुलांनी त्याच्या गळ्यातील 5 ग्रॅमची मंगलपोत तोडली. अचानकपणे गळ्यातील पोत तुटून खाली पडल्यावर शुभांगी हिच्या प्रकार लक्षात आला.

दोघा मुलांनी पोलिसांना अर्धातास पळविले
याचवेळी बसस्थानकात गस्तीवर असलेले होमगार्ड पुरुषोत्तम पाटील, सुनील शिरसाठ यांनी मंगलपोत तोडून पळणार्‍या दोघा मुलांचा पाठलाग केला. मात्र बसस्थानकाच्या मागील तुटलेल्या भितींवरुन दोघे पसार झाले. होमगार्डने हा प्रकार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कळविला. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सतिष करनकाळ यांनी बसस्थानक गाठले. तसेच दोन्ही होमगार्ड यांच्यासोबत दुचाकीवरुन संबंधित मुलांचा बसस्थानकाच्या मागील बाजूस शोध घेतला. पोलिसांना पहाताच अल्पवयीन मुलांनी गल्लोगल्ली पळ काढला. गल्लोगल्लीच्या रस्त्यावर पाठलाग करुन अर्धातासानंतर पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडून त्यांनी चोरलेली अर्धी मंगलपोत हस्तगत करण्यात आली. दोन्ही अल्पवयीन मुले ही सिल्लोड येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगत असून उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. पोलीस अधिकची चौकशी करत असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Copy