विरोधी पक्षनेत्याने करू नये ते सर्व राहुल गांधी करताय: भाजप

0

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनी सैनिकात संघर्ष झाला. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण आहे. सीमेवरील वातावरण तापलेले असतांना आता देशातील राजकारण देखील तापले आहे. भाजपा विरूद्ध काँग्रेस असे आरोप प्रत्यारोप होत आहे. सीमेवरील संघर्षानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वारंवार सरकारवर निशाणा साधत प्रश्न करत आहेत. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधी संसदेच्या संरक्षण स्थायी समितीच्या एकाही बैठकीत सहभागी झाले नाहीत. मात्र, वेदनादायी गोष्ट ही आहे की, ते सातत्याने देशाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर लष्कराच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल गांधी ते सगळ करत आहेत, जे एका जबाबदार विरोक्षी पक्षनेत्याने करायला नको,” अशी टीका नड्डा यांनी केली आहे. नड्डा यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.

“राहुल गांधी अशा वंशपरंपरेतून येतात, जिथे संरक्षणा संबंधित समित्यांचे काही स्थान नाही. फक्त आयोग चालतात. काँग्रेसमध्ये असे अनेक पात्रता असलेले नेते आहेत, ज्यांना संसदीय विषयांचे महत्त्व माहिती आहे, पण एक घराणे अशा नेत्यांना मोठे होऊ देणार नाही. हे खरोखर दुःखद आहे,” असा हल्लाबोल नड्डा यांनी ट्विट करून काँग्रेसवर केला.

Copy