विरोधाभास दाखवणारी जीवघेणी अस्वस्थता…!

0

राजकारणात डोरेमोन, पोकेमोन, मोगली आदी कार्टून्सवर चर्चा करून चॅनल्सचा टीआरपी वाढवणार्‍या मंत्री अथवा पुढार्‍यांना रस्त्याच्या कडेला झोपलेला हा भारतीय मतदार दिसत नसेल का? का काळ्या रंगाच्या गाडीच्या काचेतून आपल्या डोळ्यावरही पट्टी बांधली आहे? असेही प्रश्‍न डोक्यात घुमले गेले. अधिवेशनात असलेल्या सुट्यांचे प्लॅनिंग करणारे नेतेमंडळी यांच्याबद्दल काही प्लॅनिंग का करत नसावेत? असे आणि अशा अनेक प्रश्‍नांचे काहूर डोक्यात माजले आहे.

या सदरातील दिलेले हे छायाचित्र आपण पाहत आहात हे नागपूरचे आहे. आता नागपूरची ओळख सांगण्याची आवश्यकता नसावीच. वंचितांसाठी जीवन अर्पिलेले आणि देशाला मजबूत बांध्यात बांधून ठेवणारे संविधानकर्ते महामानव डॉ. बाबासाहेबांची दीक्षाभूमी ते सध्याच्या सरकारची अत्यंत महत्त्वाची जागा अर्थात संघभूमीतील. खास ओळख म्हणजे आपल्या राज्याचे अत्यंत हुशार आणि वकिली माइंड म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य जनतेप्रति अत्यंत तळमळ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची एक महत्त्वाची कमान असलेले केंद्रातील महत्त्वाचे मंत्री नितीन गडकरी आणि आणखी बरेच काही आपल्या कुशीत सामावलेले नागपूर. याच कुशीत या छायाचित्रात दिसणारी ही माणसंसुद्धा अनेक ठिकाणी अगदी आरामात पहुडलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे राज्यात राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या विधानभवनापासून केवळ 200 मीटर अंतरावरचे हे छायाचित्र. हा फोटो सोशल मीडियावर टाकल्यावर सेलिब्रेटी राजकारण्यांच्या सोबतच्या फोटोपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या. ’विधानभवनापासून 200 मीटर अंतरावर सुखात निजलेला भारतीय मतदार’ असं या फोटोचं शीर्षक होतं. रात्री साधारण 12.30 ची वेळ असेल. चांगल्या व्यवस्थेचे उपभोक्ता असलेल्या लोकांना सहसा लवकर झोप येत नाही. कदाचित याचमुळे मलाही झोप येत नसल्याने रात्री शतपावले करण्याच्या इराद्याने बाहेर पडल्यावर हे अत्यंत विरोधाभास असलेलं चित्र पाहायला मिळालं. ते चित्र पाहिल्यावर अगदीच स्वार्थीपणानेच ’स्टोरी’ होईल या इराद्याने मोबाइल काढून हा फोटो घेतला. फोटो मोबाइलमध्ये घेऊन तर ठेवला. मात्र, हा फोटो पाहिल्याबरोबर वेगळीच अस्वस्थता जाणवायला लागली. एकीकडे करोडो रुपये खर्च करून सुरू असलेला सरकारी सोहळा रंगलेला. सगळ्या आरामदायी सोयीसुविधा असूनही झोपेसाठी गोळ्या खाणारे लोक, तर दुसरीकडे जगण्यापुरतं कमावून 9 ते 10 डिग्रीच्या थंडीत रस्त्याच्या कडेला अतिशय सुखात झोपलेला हा भारतीय मतदार.

अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, दारिद्र्यरेषेखालील जीवन व्यतित करणार्‍या लोकांचे प्रश्‍न, बोगस रेशन कार्ड, कामगारांचे वेतन यांसारख्या सामान्य माणसांच्या प्रश्‍नांसह नोटाबंदीसारख्या केंद्रीय स्तराच्या विषयावर तासन्तास चर्चेची गुर्‍हाळे चालत होती. दिवसभर गुर्‍हाळ गाळून झाल्यावर रात्रीच्या झोपेची चिंता असलेले मंत्री अथवा नेतेमंडळी या रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांसारखे सुखात झोपू शकत असतील का? असा प्रश्‍न मनात आल्याशिवाय राहिला नाही. नागपूर अधिवेशन एक सहल नावाचा एक चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात राजकारण्यांच्या बारीक गोष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातदेखील असे काही प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणात डोरेमोन, पोकेमोन, मोगली आदी कार्टून्सवर चर्चा करून चॅनल्सचा टीआरपी वाढवणार्‍या मंत्री अथवा पुढार्‍यांना रस्त्याच्या कडेला झोपलेला हा भारतीय मतदार दिसत नसेल का? का काळ्या रंगाच्या गाडीच्या काचेतून आपल्या डोळ्यावरही पट्टी बांधली आहे? असेही प्रश्‍न डोक्यात घुमले गेले.

अधिवेशनात असलेल्या सुट्यांचे प्लॅनिंग करणारे नेतेमंडळी यांच्याबद्दल काही प्लॅनिंग का करत नसावेत? असे आणि अशा अनेक प्रश्‍नांचे काहूर डोक्यात माजले आहे. निवडणुका जवळ आल्यावर हात-पाया पडून आणि मतदाराला देव म्हणून पुजणारे पुढारीजन बाकीचे पाच वर्षे या देवाला ’रामभरोसे’ सोडून मोकळे झालेले असतात. अर्थात असे फोटो प्रत्येकच ठिकाणी आपल्याला दिसून येतील. बड्या-बड्या हॉटेल्सच्या समोर, उद्योगपतींच्या घराच्या परिसरात, अनेक समाजसेवकांच्या घराच्या परिसरातदेखील असू शकतात. मात्र, सरकार म्हणून काम करणार्‍या सिस्टिमला याची सर्वाधिक जाणीव असायला हवी. आज अनेक ठिकाणी अंग गोठवणार्‍या थंडीत मायेची ऊब देणार्‍या अनेक व्यक्ती व संघटना एकीकडे आपल्या स्तरावरून अशा लोकांसाठी काम करत असताना मतांसाठी पाया पडणारे मात्र काचेतून बघण्यातच धन्यता मानत असतील.

आपल्याला अस्वस्थ करणारी अनेक चित्रे आजकाल सोशल मीडियामुळे आपल्याला रोज पाहायला मिळत असतील. अधिवेशन संपले. ते लोकं अजूनही तिथंच झोपली असतील का? असा सवाल माझ्या डोक्यात अजूनही घुमतोय. अशी अनेक चित्र पाहिल्यावर अनेक सवाल पैदा होतातच. हा विरोधाभास मिटायला हवा एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी सरकार आणि मतांसाठी पाया पडणार्‍या वर्गाने तसेच आपल्यालाही आपल्या मस्तकाची मशागत करावी लागणार आहे, तरच अस्वस्थता थांबेल.
जर आपण अस्वस्थ होत नसाल, तर 8 डिग्रीच्या थंडीत रस्त्याच्या कडेला बारीक असून नसल्यासारखे पांघरूण ओढून फक्त एक रात्र झोपून बघा.

मशागत- निलेश झालटे
9822721292