विरोधकांवरच दाखल व्हावा मनुष्यवधाचा गुन्हा

0

भुसावळ : भुसावळातील अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे पेटलेल्या राजकारणानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांचे पूत्र तथा कृउबा सभापती सचिन चौधरी यांनी सत्ताधार्‍यांवर टिकेची तोफ डागत अमृत योजनेत गैरव्यवहार झाल्याचा दावा केल्याने ऐन पावसाळ्यात भुसावळातील राजकीय आखाडा तापवला होता तर चौधरींच्या आरोपाचे खंडण करण्यासाठी भुसावळात सत्ताधारी भाजपा पदाधिकार्‍यांनी जळगाव रोडवरील नगराध्यक्षांच्या काच बंगल्यात शुक्रवारी पत्रकार परीषदेत घेवून आरोपांचे खंडण केले. माजी आमदार चौधरींची सत्ता असतानाही दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा सत्ताधार्‍यांनी करीत नागरीकांच्या झालेल्या मृत्यूमुळे मनुष्यवधाचा गुन्हा सत्ताधार्‍यांवर निश्‍चित दाखल करावा मात्र सुरूवात स्वतःपासून करावी, असा टोलाही लगावण्यात आला. आगाामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शहरात राजकारण सुरू झाल्याची टिकाही यावेळी करण्यात आली.

विरोधकांकडून घाणेरडे राजकारण : प्रा.सुनील नेवे
भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे म्हणाले की, कालची पत्रकार परीषद संभ्रम निर्माण करणारी असून अस्वच्छतेत ज्यावेळी पालिकेचा क्रमांक आला त्यावेळी चौधरींच्या गटातील सत्ता होती मात्र आमच्या काळात किमान स्वच्छतेबाबत सुधारणा होवून त्यात क्रमांक प्राप्त होवून पालिकेचा नावलौकीक वाढवला. फेब्रुवारी महिन्याचा आधार देत विरोधकांनी जो अहवाल सादर केला त्यात 44 टक्के पाणीपुरवठा दूषित असल्याचे म्हटले असलेतरी त्यावेळी बंधार्‍यातील पाणी संपले होते. 12 फेबु्रवारी जिल्हाधिकारी व नगराध्यक्षांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून आवर्तनाची मागणी केली मात्र त्यास उशीर झाला. वास्तविक चौधरींची सत्ता असतानाही असे अनेक अहवाल दूषित पाण्याचे आले होते शिवाय त्याबाबत 22 नोव्हेंबर 2014 रोजीदेखील त्याबाबत आलेल्या अहवालाची प्रत त्यांनी माध्यमांना दाखवली. विरोधक घाणेरडे राजकारण करीत असल्याचे त्यांनी सांगत नागरीकांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आमच्यावर खुशाल मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत मात्र सुरूवात त्यांच्यापासून करावी. भाजपा नगरसेवक एकसंघ असून चौधरींनी त्यांचे नगरसेवक टिकवावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

भ्रष्टाचार करणारेच आरोप करताय : रमण भोळे
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, ज्यांनी नेहमीच भ्रष्टाचार केला तेच आता आमच्यावर भ्रष्टाचार करीत आहेत. विरोधकांनी त्यांच्याकडे सत्ता असताना नेमके काय प्रयत्न केले? याची माहिती जनतेला द्यावी, किती योजना आणल्या, आहे त्या योजनेत काय बदल केले, किती पंप आणले याची माहिती त्यांनी द्यावी, असे सांगून ते म्हणाले की, विरोधकांना पोटदुखीचा आजार असून अमृत योजनेत भ्रष्टाचार झालेला नसून हवी तर विरोधकांनी एखाद्या एजन्सीद्वारे चौकशी करावी. स्मशानभूमीत 2011 पासून मृत्यू दाखला देणे बंद करण्यात आले असून यापूर्वी मुंबईतील गुन्हेगारी विश्‍वाशी संबंधीत व्यक्तीच्या निधन झाल्याबाबत भुसावळातून दाखला देण्यात आल्याने त्यावेळी कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाला होता शिवाय स्मशानभूमीतील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने शासन निर्देशानुसार प्रभागातील नगरसेवकाचा दाखला दिल्यानंतर पालिकेच्या रेकॉर्डमध्ये तो जोडल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र दिले जात आहे.

हे भावी म्हणूनच राहणार : युवराज लोणारी
नगरसेवक युवराज लोणारी म्हणाले की, हे लोक राजकीय बेरोजगार असून त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. 2016 मध्ये लोकांनी यांना घरचा रस्ता दाखवला असून विधानसभा निवडणुकीतही काहींनी भावी आमदार लावले व ते भावीच राहिले व आताही काहींना भावी नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पडत असलेतरी ते स्वप्नच राहणार आहे. यांच्या काळातच अनेक अपहार झाल्याचे जनतेला सर्वश्रृत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये दोन भ्रष्टाचाराच्या केसेसचा त्रास अद्यापही होत असल्याचे सांगून इंग्लीश स्पिकींग कोर्सच्या नावाने 25 लाखांचा अपहाराचा प्रयत्न झाला तसेच बाजार मक्त्यातही अपहार झाल्याचा दावा त्यांनी केला. आमच्या कुटुंबात जरी धुसफूस असलीतरी त्यांच्याकडे त्यांचेच नगरसेवकही नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

पिंटू ठाकूरांची नाराजी झाली दूर
प्रभागातील विकासकामांसाठी किडनी विकण्याची घोषणा नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी केल्याने सत्ताधार्‍यांमध्ये फुट पडली आहे का ? असा प्रश्‍न विचारला असता नगरसेवकांमध्ये थोडी फार नाराजी असतेच व ती विकासकामे करण्यासाठी होती मात्र आता ठाकूर यांची नाराजी दूर करण्यात आली असून ते भाजपामध्येच असून भाजपाच्या तिकीटावर लढतील, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

रस्त्यांची कामे मार्गी लागणार
सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा असलातरी सर्वसामान्य जनता आता अशुद्ध पाण्याचे फोटो सोशल मिडीयावर टाकत असून रस्त्यांची कामे होत नसल्याने नाराजी वाढली आहे? शिवाय जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरीफाक्युरेटची भिंत पडल्यानंतरही ती का बांधण्यात आली नाही? असा प्रश्‍न ‘जनशक्ती प्रतिनिधी’ने प्रश्‍न विचारला असता नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने अडचण होती व ती आता दूर करण्यात आली आहे. क्लोरीफाक्युरेटरची भिंत बांधण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर झाला असून आज मुख्याधिकार्‍यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे शिवाय शहरातील रस्त्यांच्या कामे आता मुख्याधिकारी आल्याने लवकरच केली जातील, असा आशावादही नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

हवे तर आलमची चौकशी करा : दिनेश नेमाडे
भाजप शहराध्यक्ष दिनेश नेमाडे म्हणाले की, जलशुद्धीकरण केंद्रात आलमचा उत्कृष्ट दर्जाचा पुरवठा केला जात असून हवे तर त्याची विरोधकांनी चौकशी करावी. शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असून विरोधक निरर्थक आरोप करीत असल्याचे ते म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला नगरसेवक मुकेश पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, माजी नगरसेवक संतोष बारसे, निक्की बत्रा, सतीश सपकाळे, देवा वाणी, पुरूषोत्तम नारखेडे, शफी पहेलवान, अमोल महाजन, आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह विरोधी गटातील नगरसेवक रवी सपकाळे यांची उपस्थिती होती.

Copy