विराट, साक्षी, दीपा, श्रीजेश, विकास यांना पद्मश्री

0

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला अव्वल बनविण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या आणि फलंदाजी तसेच कप्तानी आशा दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी करत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. विराटसोबतच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी दीपा कर्माकर, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, थाळीफेकपटू विकास गौडा या क्रीडापटूंनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. त्या क्रीडा क्षेत्रात आपल्यातील कलागुणांनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांचा भारत सरकारकडून दरवर्षी पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात येतो.

विराट दमदार
भारतीय संघाचा युवा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षात क्रिकेट विश्वात आपल्या दमदार कामगिरीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध शानदार विजय साजरा केला. याशिवाय, कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय कसोटी संघाने क्रमवारीत अव्वल स्थान देखील कायम ठेवले. विराटने आपल्या वैयक्तिक कामगिरीनेही देशाचे नाव उंचावले आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली अव्वल होता. कोहलीच्या या कामगिरीची दखल घेत त्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नारीशक्तीला सलाम
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला महिला कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावलेली साक्षी मलिक हिला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला कुस्तीमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून देणारी साक्षी मलिक पहिला भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पथकातील दिग्गजांकडून निराशा होत असताना साक्षीने पदक मिळवून भारताचे खाते उघडले होते. याच ऑलिम्पिक स्पर्धेत कलात्मक जिम्नॅस्टमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी दीपा कर्माकर देखील पद्मश्री पुरस्काराची मानकरी ठरली आहे. जिम्नॅस्टीक्सच्या प्रोड्युनोव्हा प्रकारात हातखंडा असलेल्या दीपा कर्माकरने रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंना तगडे आव्हान दिले होते.

दोन दीपा सन्मानित
दिपाचे कांस्यपदक काही गुणांच्या फरकाने हुकले होते. दिपाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. असे असले तरी टोकियो २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सोनेरी कामगिरी करण्यासाठी रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरीचा खूप फायदा होणार असल्याचेही तिने सांगितले होते. कोहली, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकर यांच्यासोबतच भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेश आणि थाळीफेकपटू विकास गौडा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.याचबरोबर पॅरालिंपिक मध्ये प्रभावी कामगिरी करून पदक जिंकणाऱ्या दीपा मलिकला देखील पद्मश्री घोषित केले आहे.