विराट कोहलीला ‘विस्डेन’कडून सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सन्मान

0

नवी दिल्ली । भारतीय कर्णधार विराट कोहलीची क्रिकेटचा महान ग्रंथ मानल्या जाणार्‍या विस्डेनने 2016 मधील वर्षातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीला हा बहुमान मिळाला आहे. विस्डेन 2017 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर कोहलीचे छायाचित्र देण्यात आले आहे. “विस्डेनच्या 2017च्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कोहलीचे छायाचित्र छापण्यात येणार आहे. 2016 या वर्षांत त्याने ज्या धावा केल्या ते पाहता त्याला हा मान देण्यात आला आहे,” असे ‘विस्डेन’कडून सांगण्यात आले आहे.

पाँटिंग पहिला मानकरी
कोहलीने गेल्या वर्षी कसोटीमध्ये 75.93 च्या सरासरीने 1215 धावा जमविल्या तर 10 वनडेमध्ये 92.37 च्या सरासरीने 739 धावा जमविल्या. याशिवाय 106.83 च्या सरासरीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 641 धावा फटकावल्या. एका कॅलेंडर वर्षात केवळ सहा फलंदाजांनी कोहलीहून अधिक धावा जमविल्या आहेत. मात्र त्यापैकी एकाही फलंदाजाला कोहलीच्या सरासरीच्या जवळपासही पोहोचता आले नव्हते. ‘विराट कोहलीने 2016 मधील जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू हा बहुमानही मिळविला आहे. 2003 पासून या बहुमानाची सुरुवात करण्यात आली असून ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग त्याचा पहिला मानकरी ठरला होता. त्याने क्रिकेटच्या तीनही प्रकारात जबरदस्त प्रदर्शन केले आहे,’ असे विस्डेनचे संपादक लॉरेन्स बूथ यांनी सांगितले.

सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंची नावे जाहीर
गेल्या वर्षांत कोहलीने दमदार कामगिरीच्या जोरावर कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) पॉली उम्रीगर पुरस्कार पटकावला होता. कोहलीबरोबर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा सन्मान या वेळी ऑस्ट्रेलियाच्या इलिस पेरीला देण्यात आला आहे. विस्नेडनने या वेळी सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली. यामध्ये पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हक आणि युनिस खान यांचा समावेश आहे. इंग्लंडच्या ख्रिस वोक्ससह बेन डुकेट आणि टॉबी रोलॅण्ड-जोन्स यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.

वर्षातील पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंची निवडही विस्डेनने जाहीर केली असून 1997 नंतर प्रथमच पाकच्या दोन खेळाडूंना त्यात स्थान मिळाले आहे. मिसबाह उल हक व युनूस खान यांना हा बहुमान मिळाला आहे. या दोघांच्या निवडीमुळे आतापर्यंत हा बहुमान मिळालेल्या पाकिस्तानी खेळाडूंची संख्या 14 झाली आहे तर भारताच्या 15 जणांना असा मान मिळालेला आहे. भारतातर्फे कोहलीच्या आधी वीरेंद्र सेहवाग (2008, 2009) व सचिन तेंडुलकर (2010) यांनी हा पुरस्कार मिळविलेला आहे.