विमानतळावर जवानाकडे सापडले ग्रेनेड

0

श्रीनगर : श्रीनगर विमानतळावर भारतीय लष्करातील एका जवानाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे तपासणीदम्यान दोन ग्रेनेड सापडले आहेत. गोपाळ मुखिया असे त्याचे नाव असून, तो 17 जेएके रायफल्सचा जवान आहे. सीमेजवळ उरी सेक्टरमध्ये त्याची नेमणूक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जवान विमानाने दिल्लीकडे निघाला होता. त्याच्या बॅगची तपासणी करताना ग्रेनेड सापडले.

सामानाच्या तपासणीत आढळले ग्रेनेड
या जवानाचे म्हणणे आहे की, सापडलेले दोन्ही ग्रेनेड त्याच्या अधिकार्‍याने त्याच्याकडे दिले होते. परंतु, पोलिसांना त्याच्या या जबाबावर विश्‍वास नसून पोलिस कसून चौकशी करत आहेत. हे एखादे देशविरोधी कटकारस्थान आहे का, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. श्रीनगर विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच कडेकोट बंदोबस्त असतो. या जवानाने विमानतळावर प्रवेश केला कारण मुख्य प्रवेशव्दारावर जवानांची तपासणी केली जात नाही. मात्र सामानाची तपासणी करताना त्याच्याकडे ग्रेनेड सापडले. त्याच्याकडे हे ग्रेनेड कुठून आले याचा तपास सुरू आहे.

ग्रेनेड घेऊन घरी जात होता..
भारतीय लष्कराच्या दिल्ली येथील मुख्यालयातून याबाबत कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आली नाही. सदर जवानाला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे, एवढेच सांगण्यात आले. घरी जाण्यास निघालेला जवान, जीवंत ग्रेनेड घेऊन कसा निघाला होता हे कोडे अद्याप सुटलेले नाही. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मिरच्या दौर्‍यावर होते. काश्मीर खोर्‍यातील व देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचे त्यांनी उद्घाटन केले होते. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.