विना परवानगी मुंबई प्रवास: तीन व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल

0

नंदुरबार: जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल राजीव गांधी नगर नंदुरबार येथील तीन व्यक्तिंविरोधात नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड यांनी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या तीन व्यक्तिंनी 30 जूनपर्यंत मनाई आदेश लागू असताना आदेशाचा भंग करीत शासनाची परवानगी न घेता मुंबई येथे प्रवास केला. पुन्हा नंदुरबार येथे आले. या दरम्यान त्यांनी कोरोना संक्रमणाची वैद्यकीय चाचणी न केल्याने इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना विषाणूविषयी कल्पना असताना व इतरांना आपल्यामुळे धोका होऊ शकतो हे माहित असताना त्यांनी विनापरवानगी प्रवास केला. स्वत:सोबत घरातील इतरांना संक्रमीत केल्याने बिक्कड यांनी भारतीय दंड संहितेचे कलम आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 54 आणि साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
शहरात अत्यावश्यक बाबींसाठीच संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक फिरू नये. परवानगी न घेता प्रवास करून नये. बाहेर फिरताना चेहर्‍यावर मास्क घालावा आणि शारिरीक अंतराचे पालन करावे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

Copy