विनाहेल्मेट 80 दुचाकीचालकांवर खटले

0

आरटीओची कारवाई मोहीम : दोन तास समुपदेशन

पुणे : विनाहेल्मेट वाहन चालवणे धोकादायक असल्याचे सांगत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत गेल्या तीन दिवसांत 80 विनाहेल्मेट आणि 22 सिटबेल्ट परिधान न करणार्‍यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच, परिस्थिती सुधारासाठी त्यांचे दोन तास समुपदेशन करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.

परवाना निलंबित करण्याचे आदेश

अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने नाराजी व्यक्त केली होती. तसेच, यापुढील काळात अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार राज्य शासनाकडून राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सूचना करून विनाहेल्मेट, विना सिटबेल्ट, मोबाईलवर बोलत तसेच दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांचा परवाना निलंबित करण्यास सांगितले होते. यानुसार आरटीओने सोमवारपासून शहरात कारवाईस सुरुवात केली. तीन दिवसांत खटले दाखल करून त्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. गुरुवारी या सर्वांचे आरटीओ कार्यालयात समुपदेशन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, संजय राऊत, स्नेहा मेढे, चंद्रशेखर चव्हाण, राजेश पुराणिक आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

..तरच खटला निकाली काढणार

विनाहेल्मेट, सिटबेल्ट न लावणार्‍यांविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्यात येत आहेत. तसेच, त्यांच्यासाठी दर गुरुवारी आरटीओ कार्यालायात समुपदेशनाचा कार्यक्रम घेण्यात येईल. समुपदेशनास उपस्थित राहील्यानंतरच संबंधीत वाहनचालकांविरुद्धचा खटला निकाली काढण्यात येणार आहे.  बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Copy