विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली

0

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुका बिनविरोध करण्याच्या द‍ृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपने नऊपैकी चार जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मतांच्या हिशोबानुसार महाविकास आघाडीचे पाच सदस्य निवडून येऊ शकतात.

२४ एप्रिल रोजी भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, शिवसेना १ अशा नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र विद्यमान विधानसभेत भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे, माकप, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष – १३ असे पक्षीय संख्याबळ आहे. या निवडणुकीत निवडून येण्यासाठी २९ मतांची गरज आहे. भाजपचे १०५ व मित्र पक्ष व अपक्ष मिळून आमचे ११५ सदस्य आहेत आणि २९ मतांचा कोटा आहे. त्यानुसार आमचे ४ उमेदवार निवडून येऊ शकतात, असा दावा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हे सदस्य झाले निवृत्त

भाजपचे स्मिता वाघ, अरुण अडसड व पृथ्वीराज देशमुख हे तीन सदस्य निवृत्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. काँग्रेसचे हरिभाऊ राठोड निवृत्त झाले असून चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजीनामा दिला होता. तर शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे निवृत्त झाल्या आहेत.

कोणाला मिळणार संधी?

यावेळी भाजपकडून एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह निलम गोर्‍हे निवडून येणे आवश्यक आहे. काँग्रेसमधून या निवडणुकीसाठी कोण उमेदवार म्हणून देण्यात येईल? याचा निर्णय दिल्लीतूनच घेण्यात येईल तर राष्ट्रवादीतर्फेकुणाची वर्णी लागते, यावर खल सुरु आहे.