विधानसभा उपाध्यक्षांना कोरोनाची लागण

0

नाशिक: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकच नाही तर राजकीय नेते मंडळी सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. राज्य सरकारवर देखील कोरोनाचे गडद संकट आहे. आतापर्यंत डझनभर मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विधानसभा अध्यक्षांना देखील कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोर आले आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्वत: ट्वीटकरून सांगितले आहे.

‘माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन झिरवाळ यांनी केलं आहे. ‘लवकरच करोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांचे कार्यालय आधीच बंद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः आठ दिवस होम क्वारंटाइन राहणार असल्याचे सांगितले होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनाही करोनाची बाधा झाली आहे. लोकप्रतिनिधींमधील वाढता करोना संसर्ग हा सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

Copy